पान:अंगारमळा (Angarmala).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण, ही मंडळी फारशी शुभ्र स्वच्छ कपड्यात दिसत नसत. वेषभूषेवरूनच त्यांची गाठ शारीरिक कष्टाशी आहे हे उघड होई. ब्राह्मणी परंपरेत वाढलेल्या कोणालाही इंजिनिअर होण्याचे फारसे आकर्षण नसे. इंजिनिअरांचे प्रकार फक्त तीनच होते. बांधकामे करणाऱ्यांना सिव्हिल इंजिनिअर म्हणत, विजेशी काय संबंध असेल तो असणाऱ्यांना इलेक्ट्रिकल म्हणत आणि यंत्राच्या साह्याने कापाकापी, घासाघाशी असली कामे करणाऱ्यांना मेकॅनिकल म्हणत.

 १९४९ सालापर्यंत इंजिनिअरिंग शिकण्यासाठी प्रवेश मिळविणे फारशी कठीण गोष्ट नव्हती. आताप्रमाणे लाखांनी 'हुंडा' देऊन प्रवेश कधीकाळी मिळवावा लागेल यावर कोणाचा विश्वासही बसला नसता. पुण्यासारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे धुरीणही घरोघर जाऊन होतकरू तरुणांना अभियांत्रिकीचे महत्त्व पटवून बळेच आपल्या कॉलेजात आणीत. त्यांच्या महाविद्यालयात एकदा गेले, की मध्ये फारशी अडचण न येता माणूस इंजिनिअर म्हणूनच बाहेर पडे.

 लग्नाच्या बाजारात वकिलांचा मान मोठा, सरकारी नोकरांचा त्याहून मोठा; डॉक्टर, इंजिनिअर हे उतरत्या भाजणीने त्यांच्या खालचे. आता अभियांत्रिकीतच शंभर सव्वाशे शाखा आहेत. M.B.B.S. होऊन कोणीच डॉक्टर थांबत नाही. प्रत्येकाला काही ना काही विशेष प्रावीण्य पदवी (Super specialisation) मिळवल्याखेरीज चालतच नाही. वकिलावकिलात विशेष नैपुण्याच्या शाखा झाल्या. वकील साधा वकील राहिला नाही. गुन्हेगारी खटले चालवणारे वेगळे, नागरी कायदे चालवणारे वेगळे, व्यपारी कायद्यांचे वेगळे, करमहसुलांचे वेगळे, हे सगळे अलीकडे अलीकडे घडले.

 गेल्या आठवड्यात मुंबईच्या एका मान्यवर महाविद्यालयात एका कार्यशाळेसाठी गेलो होतो. तिथल्या प्राचार्यांनी, कलाशाखेबद्दल विद्यार्थ्यांत फारशी रुची नाही याबद्दल हळहळ व्यक्त केली.

 कला विभागाची मोठी गंमत आहे. गेली काही दशके तरी ज्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याइतके गूण मिळत नाहीत, अभियांत्रिकीलाही जाता येत नाही, अगदी वाणिज्य शाखेतसुद्धा प्रवेश मिळण्यासारखा नसतो तेव्हाच विद्यार्थी, अगदी नाइलाजाने, कला महाविद्यालयात जाऊन बी.ए. पदवीचा प्रयत्न करू लागतो. बाकीच्या शाखांत प्रवेश मिळणे कठीण झालेल्या या विद्यार्थ्यांतही वर्षानुक्रमे द्वितीय वर्ग, प्रथम वर्ग, विशेष प्रावीण्य, सुवर्णपदके इ. मिळवणारे निपजतात. असे उशिरा चमकू लागणारे खडे पदवीनंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करू लागतात. ते नच जमल्यास

अंगारमळा । ४८