पान:अंगारमळा (Angarmala).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पुढे पुढे बॅरिस्टर हे आमच्या मर्जीतून पार उतरले. बॅरिस्टरची अशी परीक्षा नसतेच. कोणत्या तरी गुत्त्यात (bar) आठ गिनी खर्च करून (१२ पेन्स = १ शिलिंग व २१ शिलिंग = १ गिनी) आणि जुन्या बॅस्टिरना खूश केले, की बॅरिस्टरी आपोआप मिळते असे कुणी सांगितले. त्यामुळे विलायतेत जाऊन फक्त बॅरिस्टर होऊन आलेल्यांचा भाव मनात ढासळला. त्याऐवजी आयसीएस करून आलेले सुभाषचंद्र बोस, चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे आमचे चरित्रनायक झाले.

 डॉक्टर त्या काळी फार फार म्हणजे M.B.B.S. M.D. आणि F.R.C.S. झालेले डॉक्टर मी मुंबईला आल्यावर तेथील इस्पितळातच पाहिले. जिल्ह्यापर्यंतचा मोठा डॉक्टर म्हणजे M.B.B.S.! या पदवीचे मोठे वैचित्र वाटायचे. B.A., B.Sc. या धर्तीवर B.M.B.S. किंवा नुसते B.M. & S. अशी सुटसुटीत पदवी का देत नाहीत, हे कळायचे नाही. बहुतेक डॉक्टर, कुणी आजारी असले तर तपासायला घरी जात असत. अगदी चांगल्या डॉक्टरचीसुद्धा घरी भेट देण्याची फी ३ ते ५ रुपयांच्या वर नसे. दाताच्या डॉक्टराची पत्रास तर न्हाव्यापेक्षा फारशी वरची नव्हती. ते कदाचित रोग्याला बसवायच्या खुर्चीतील सारखेपणामुळेही असेल! M.B.B.S. झालेल्या आणि होऊ पाहणाऱ्या सगळ्या भद्र लोकांनी आम्हाला पार पटवून दिले होते, की M.B.B.S. च्या पाच वर्षांच्या पाच परीक्षा एकदाही नापास न होता सरळसोट पाच वर्षात कोणी विद्यार्थी पार करूच शकत नाही. एखादे वर्ष तरी बुडणारच. विद्यार्थी फारच हुशार असला तर असूयेपोटी प्राध्यापक त्याला एक वर्ष तरी नापास करतातच अशी आमची पक्की समजूत होती. अशीच काहीशी समजूत C.A. (चार्टर्ड अकौंटंट) या हिशेब तपासनिसाच्या संबंधी सर्वदूर होती. कुणा हिशेब तपासनिसाकडे उमेदवारी करता करता तीन परीक्षा द्यायच्या; पण बहुतेकांचा हा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालायचा. महाराष्ट्रात त्या काळी दोनतीन Actuary खूप गाजले होते. या लोकांचा नेमका व्यवसाय काय हे बऱ्याच वर्षांनी कळले होते. जीवनविमा उतरवणाऱ्यांच्या हप्त्यांची रक्कम काय असावी याचा हिशेब करण्याचा हा धंदा. याला एवढा मान का असावा आणि त्यात एवढे काय कठीण असावे की ज्यामुळे भारंभार पगार मिळावा हे आमच्या समजेपलीकडेचे होते. खूप खूप वर्षांनंतर स्वित्झर्लंडमध्ये माझ्या कार्यालयात काम करणारा माझ्या बरोबरीचा एक सहकारी पाहून ॲक्च्युअरी होण्याकरिता लागणाऱ्या बुद्धिमत्तेचे आणि तपस्येचे आपले हिशेब चुकले तर नव्हते ना, असे वाटू लागले.

 मी प्रवेशपरीक्षा पास होण्याआधी इंजिनिअर लोकांना फारसा मान नव्हता. पहिले

अंगारमळा । ४७