पान:अंगारमळा (Angarmala).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी शिक्षणगाथा


 आमच्या काळी महाविद्यालयाची प्रवेशपरीक्षा शाळेच्या अकराव्या वर्षाच्या शेवटी होई. १९४९ सालापर्यंत या परीक्षेला मॅट्रिक्युलेशनची परीक्षा म्हणत; सर्वसामान्यांच्या बोलण्यात नुसतेच मॅट्रिक. मॅट्रिक म्हणजेच मोजमाप. हे मोजमाप झाले, की उच्चशिक्षणाची व विश्वविद्यालयीन अभ्यासाची दारे खुली होत.

 शाळेतले विद्यार्थी जवळ असताना वडीलधारी माणसे सरकारी नोकरीत असली, वकील असली तर आपल्या विद्यार्थिजीवनाविषयी फारसे बोलत नसत. मॅट्रिक झाले म्हणजे मोठी बाजी मारली, पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट होणे म्हणजे तर पराक्रमाचा कळसच. त्या काळी बी.ए. झाल्यानंतर एम.ए. वगैरे करण्याच्या भानगडीत फारसे कुणी पडत नसे; प्राध्यापक होतकरूच एम.ए.च्या वाटेला जायचे. विद्वन्मान्यतेचे एकदोनच आदर्श एक, आचार्य अत्रे, बी.ए.,बी.टी.,टी.डी. (लंडन), एवढा शिकलेला आणि वर आचार्य, म्हणजे काहीचा काहीच विद्वान माणूस असे वाटायचे. वकील होण्यासाठी बी.ए. होण्याची आवश्यकता नसे, एरवीही कायद्याच्या पदवी परीक्षेला बसता येत असे. पुष्कळसे वकील तर बऱ्यापैकी व्यवसाय चालणाऱ्या वकिलांच्या पदरी कारकुनी करतच वकिली व्यवसायात घुसलेले असायचे.

 तालुक्याच्या गावचा वकील हा भीतीचा विषय होता, आदराचा नव्हता. वकिली प्रदेशातला मान्यवर म्हणजे 'बॅरिस्टर'. त्यावेळचे बहुतेक सारे वंदनीय नेते बॅरिस्टरीची परीक्षा विलायतेत देऊन आलेले. महात्मा गांधी बॅरिस्टर; जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, जमनादास मेहता सारे सारे बॅरिस्टरच. कोणी माणूस अत्रापपणे युक्तिवाद करू लागला, की कुचेष्टेने त्याला, 'बाळा, बाळा, बॅरिस्टर का रे नाही झालास?' असे विचारीत.

 वकिलांचे सगळ्यांचे उत्पन्न चांगले असे. बॅरिस्टर लोकांचा थाट मोठा. काळा डगला, पांढरा शुभ्र खमीस. ही माणसे सारी बिनकॉलरच्या खमीसावर दोरीने कॉलर का बांधत हे आम्हाला समजायचे नाही. इंग्लंडच्या थंड हवेतल्या बॅरिस्टरचा डगला हिंदुस्थानच्या उष्ण दमट हवेत घातला, की पांढराफेक कडक इस्त्रीचा शर्ट दोन दिवस लागोपाठ घालणे काही शक्य होत नाही आणि एक एक दिवस धुलाईचा शर्ट घालावा अशी मिळकत बहुतेक त्या काळच्या बॅरिस्टरांना मिळत नसावी.

अंगारमळा । ४६