पान:अंगारमळा (Angarmala).pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनातली मरगळ झटकून टाकण्यासाठी.

 बापूरूपी मोहोळाची कितीतरी रूपे स्वरूपे गेल्या पांच वर्षात मी पाहिली आहेत. गिरणा कारखान्याने उसाच्या आंदोलनाची उपेक्षा करून २३ ऑक्टोबर १९८० रोजी गळीत चालू करायचे ठरवले. उसाच्या मोळ्या गव्हाणीत पडण्याच्या आधी तरुण कार्यकर्ते त्यांत उड्या टाकतील अशी घोषणा झाली. २३ ऑक्टोबरला कारखान्यावर हजारो शेतकरी जमले,कारखाना बंद राहिला. आज तो कारखाना सभासदांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती सुपूर्त केला आहे.

 १९८० च्या रास्ता रोकोत बागलाणची कामगिरी खरी वाघाची. मंगरूळ पीर फाटा, सौंदाणे, उमराणे, झोडगे शेतकऱ्यांनी प्रचंड संख्येने लढवले आणि मारही तसाच अफाट सोसला. १३ नोव्हेंबर मंगरूळ पीर फाट्यावर सैरभैर झालेले शेतकरी सांभाळणारे बापू, जानेवारी १९८० मध्ये सटाण्यांतील ऐतिहासिक मेळाव्याचे कर्णधार बापू. १० नोव्हेंबर १९८१ च्या टेहऱ्यांतील गोळीबाराला तोंड देणारे बापू, जानेवारी १९८२ च्या सटाण्याच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष बापू.

 सटाण्याच्या अधिवेशनाचे सगळेच स्वरूप म्हणजे बापूंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वभावाचे आणि वक्तिमत्वाचे प्रतिबिंबच. काम प्रचंड पण कुठे गोंधळ नाही, गडबड नाही सर्व अगदी शिस्तीने आणि वेळच्यावेळी चाललेले. सगळ्या विश्वाचा संसार तर दिसावा पण त्याचा नियंता मात्र कुठेच दिसू नये त्याप्रमाणे सटाण्याच्या अधिवेशनाची सूत्रे हलविणारी मंडळी कोण हे शेवटपर्यंत आम्हा पाहुण्यांना कळलेच नाही.

 तसे बागलाण भागांत अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, महर्षि आणि नेते यांचा काही तोटा नाही. बापू या सगळ्यांचे उलटे टोक. बोलणार फार थोडे, अहंकाराचा अगदी स्पर्श नाही. याउलट स्वत:कडे कमीपणाच घेण्याची प्रवृत्ती. तनमनधनाने स्वत:ला झीज लावून घेण्याची तयारी, तरीही सतत हसरा चेहरा आणि विनोद समजण्याची करण्याची ताकद.

 गेल्या तीन-चार वर्षांत संघटनेच्या कामाबरोबर मला व्यक्ति म्हणून अनेक कठीण, अगदी अंत:करण फोडून टाकण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागाल. बापू माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान. पण या काळात त्यांनी जो आधार दिला त्याचे ऋण सांगण्याचा प्रसंग कधी नंतर येईल. आज फक्त बापू नावाच्या मोहोळाचा संघटनेचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीचा हा आढावा आहे.

अंगारमळा । १९७