पान:अंगारमळा (Angarmala).pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आंदोलनाची सर्व परिस्थितीच पालटली, निवडणुकीच्या आधी उभारायच्या प्रचंड आंदोलनाच्या योजना बांधून बाजूला ठेवाव्या लागल्या. देशभर शीख बांधवांविरुद्ध दंगली घडवून आणण्यांत आल्या.

 स्व. इंदिराजींच्या मृत्यूचे दुःख, नवीन पंतप्रधानांबद्दल वाटणारी चिंता यांनी देश भारून गेला. त्यांचा फायदा घेण्याकरिता निवडणुका जाहीर झाल्या. ज्या खिंडीत शासनाला गाठायचे ठरले होते ती खिंड एकदम भूकंप होऊन राजमार्ग बनला.

 बापूंच्या नेतृत्वाची आता खरी कसोटी सगळ्या खेळींचे आडाखे उधळून गेल्यावर लागली. एका पाठोपाठ एक कार्यकारिणीच्या बैठका घेतल्या गेल्या. खचून गेलेल्या विरोधी पक्षांच्या फळीला उचलून धरण्याचा निर्णय झाला. गावबंदीच्या कार्यक्रमाने महाराष्ट्र झपाटून गेला. अडाणी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता देता पुढाऱ्यांच्या नाकी दम आला. सगळ्या देशात इंदिरा पक्षाची मते दहा टक्क्यांनी वाढली. फक्त महाराष्ट्र एकच राज्य असे की जेथे राज्यकर्त्या पक्षाची मते घटली. पण लोकसभेतील जागांच्या हिशेवांत अक्षरश: पानिपत झाले.

 या उलट संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला. भुईसपाट झालेल्या विरोधकांना एकत्र आणले. त्याकरिता धुळ्याच्या अधिवेशनाचा प्रचंड संसार उभारावा लागला. त्यातून पुलोद आघाडी तयार झाली आणि विरोध बचावला. एकहाती सत्तेचा धोका टळला. शेतकरी आंदोलनाच्या मार्गात आलेली धोंड दूर झाली.

 २३ फेब्रुवारी १९८५ रोजी पंतप्रधान राजीव गांधींनी घोषणा केली 'कृषि मूल्य आयोगाचे नाव बदलून आता ते कृषि मूल्य आणि उत्पादनखर्च आयोग करण्यांत आले आहे' अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बापूंनी स्वातंत्र्यवर्षाचा कार्यक्रम जवळ जवळ ठरवलेल्या अवधीत पुरा केला.

 खरं पाहिले तर बापू ही व्यक्ति नाहीच, बागलाण तालुक्यांत कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. या मोहोळाला आपण सगळे बापूंच्या नावाने ओळखतो एवढेच. सप्टेंबर १९८० मध्ये सटाण्याच्या नगरपालिका सभागृहांत एक सहकारी क्षेत्रातील कार्यकत्यांची बैठक होती. अनायासे माधवराव खंडेराव, प्रल्हादराव व मी आसपास मालेगांवला होतो. आम्हाला सटाण्याला नेण्यात आले. दोनचारशे कार्यकर्त्यांसमोर त्या दिवशी झालेली भाषणे अविस्मरणीय झाली. बस, त्यानंतर बागलाणमध्ये प्रचार करण्याची, पटवून देण्याची गरजच पडली नाही. ते काम सगळे या कार्यकर्त्यांच्या मोहोळानेच थेंबाथेंबाने केले, पण एका रात्रीत केले. बागलाणमध्ये आम्ही फिरतो ते प्रचाराकरिता नाही, आमच्याही

अंगारमळा \ १९६