पान:अंगारमळा (Angarmala).pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आली. चंदीगडला येणाऱ्या आगगाड्या, बस बंद करण्यांत आल्या. शेतकऱ्यांच्या नव्या ताकदीला राजकीय मान्यता मिळाली.

 शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यवर्षाची रणभूमी आता महाराष्ट्रांत आली. वर्षाअखेर शासनाला निवडणुकीच्या खिंडीत गाठून परभणीच्या मागण्या मिळवून घेता येतील हा आडाखा ठरला. महाराष्ट्रभर प्रचार मोहीमेचा धडाका चालू झाला.

 सप्टेंबर १९८४ मध्ये दक्षिण महाराष्ट्र मोटर सायकल प्रचार फेरीचा अभूतपूर्व कार्यक्रम झाला. हजारो मोटारसायकली एका मागोमाग एक लष्कराच्या शिस्तीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर जिल्हे जागवून आल्या. कोपरगांवच्या डोळे फाडून टाकण्याच्या मेळाव्याने समारोप झाला. २ ऑक्टोबरला गुजरातमधील बार्डोलीतून दोन प्रचार यात्रा निघाल्या एक बारडोली ते साबरमती आणि दुसरी बारडोली ते धुळे, जळगांव, विदर्भ, मराठवाडा मार्गे टेहरे. प्रचार यात्रेत उत्साहाला उधाण आले होते. ३१ ऑक्टोबर रोजी टेहरे येथील मेळाव्यांत संघटना काय आदेश देते याकडे सगळे लक्ष लागले होते. हिंगणघाट येथे या प्रचार यात्रे दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राष्ट्रीय परिषद झाली.

 एवढ्या रणधुमाळीत बापू आणखी एक मोठे किचकट आणि बापूंच्या भाषेत 'घाणेरडे' काम सांभाळत होते. नाशिक जिल्ह्यांतील पाचहीं साखर कारखाने आणि ठेगोड्याच्या सूत गिरणीच्या निवडणूका याच वेळी जाहीर झाल्या. निवडणूकांसाठी पॅनेल तयार करणे, प्रचाराची मोहीम सांभाळणे ही कामे कोणीतरी करायला पाहिजे होती. या कामावर बापू फार नाराज असायचे. मला कितीदा म्हणाले, 'निवडणुकांच्या घाणीपासून दूर रहावे म्हणून संघटनेत आलो आणि पुन्हा त्याच घाणीच्या आसपास फिरावे लागते आहे." निवडणुका म्हटल्या की भल्याभल्यांची डोकी फिरून जातात. अगदी बापूंवर आणि भास्करभाऊंवरही लोक जिभा सोडू लागले. शत्रूशी सामना करतांना कधी न डगमगलेले बापू जिवलगांच्या शब्दांनी कासावीस होऊन जायचे.

 ३१ ऑक्टोबर १९८४ उगवला. प्रचारयात्रेला आता मुसळधार वृष्टीने तुडूंब भरून चाललेल्या महानदीचे रूप आले होते. गावागावांत यात्रेचे स्वागत करतांना शेतकरी अबालवृद्ध स्त्री पुरुष येणाऱ्या स्वातंत्र्याचेच जणू दर्शन घेत होते. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य ओठाशी आले असे क्षणमात्र वाटले.

 पण नियतीच्या मनात काही वेगळाच खेळ होता. यात्रा टेहऱ्याला पोचण्याआधी पंतप्रधान इंदिरा गांधींवरील हल्ल्याची आणि त्या जखमी झाल्याची बातमी आली.

अंगारमळा \ १९५