पान:अंगारमळा (Angarmala).pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळा देश हिंदू-शीख दंगलींनी पेटला आहे असा समज होता तेव्हा सत्तर हजार शीख शेतकरी बांधवांबरोबर महाराष्ट्रातील दीड हजार शेतकरी उभे ठाकले. १२ ते १८ मार्च या सातच दिवसांत शेतकरी संघटनेने अगदी अटकेपार झेंडा नेला. शेतकरी चळवळ आता देशभर पसरली. शेतीमालाचा भाव ही शेतकऱ्यांच्याच नव्हे तर देशाच्या विकासाची गुरूकिल्ली आहे हे राज्याराज्यांतल्या शेतकरी कार्यकर्त्यांच्या मनोमनी पोचले. भगतसिंग-राजगुरूंच्या मिलापानंतर पुन्हा एकदा पंजाब-महाराष्ट्र आघाडीने उभा राहिला. धान्य बंदी कार्यक्रम पंजाबात राबवायचा होता. १ ते ८ मे पंजाबमध्ये भल्या प्रचंड गव्हाच्या मंड्यांवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम पार पडला. १० जूनपासून गव्हाची वाहतूक रोकण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. शेतकरी झेंडा झपाट्याने पुढे सरकत होता आणि तेवढ्यांत...

 अटकेपार झेंडा नेणाऱ्यांवर पानिपतच्या पराभवाचा प्रसंग ओढवण्याची वेळ आली. पंजाबांतील शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फायदा उडवण्याचा प्रयत्न अकाली करत होते आणि अकाली आंदोलनाच्या ज्वालेचा फायदा अतिरेकी उठवू पहात होते. महिने महिने जेलभरो आंदोलन करूनही शासन बघत नाही या अनुभवाने मति कुंठित झालेल्या अकाली नेतृत्वाला संघटनेने परभणीत दिलेल्या कार्यक्रमांतील प्रतिभा जाणवली आणि त्यांनीही तीन जूनपासूनच गव्हाची वाहतूक रोकण्याचा कार्यक्रम जाहीर केला.

 त्यानंतर लष्कराचा प्रवेश, सुवर्णमंदिरांतील रणकन्दन हा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. पण पंजाबमधील प्रत्येक गावात काय घडले हे कुठे छापून आले नाही.

 अतिरेक्यांच्या बंदोबस्ताकरता आलेल्या लष्कराचा आणि पंजाबमधील तंग वातावरणाचा फायदा घेऊन शेतकरी आंदोलन खच्ची करण्याचे कारस्थान सुरू झाले. गावोगाव घुसून वीजेच्या बिलाच्या आणि कर्जाच्या वसुलीसाठी हाणमार, पोलिसी छळ, धरपकड चालू झाली. एवीतेवी शेतकऱ्यांना पकडून नेले जातच आहे. मग मेंढ्यांसारखे तुरुंगात कां जावे? वाघासारखे जावे या हेतूने १ जुलैपासून जेलभरो आंदोलन सुरू झाले. महाराष्ट्रातून एक छोटासा जथा पंजाबमधल्या शेतकऱ्यांची दोस्ती दाखवून देण्याकरिता गेला. २० जुलै रोजी त्यांना अटक झाली.

 महाराष्ट्रभर या अटकेविरुद्ध निदर्शने झाली. शेकडो हजारोंनी शेतकरी तुरुंगात गेले. फार मोठ्या प्रमाणावर स्त्रिया या निदर्शनात सामील झाल्या. या निदर्शनांची सूत्रे बापूंनी स्वत: सांभाळली होती.

 १० सप्टेंबर १९८४ रोजी चंदीगड येथे शेतकरी मेळावा होता. त्यावर बंदी घालण्यांत

अंगारमळा \ १९४