पान:अंगारमळा (Angarmala).pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
बापू नावाचे मोहोळ


 रामचंद्र बापू पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा २६ मार्च १९८५ रोजी भास्करराव बोरावके यांच्याकडे सोपवली. संघटना आणि प्रचार या माझ्याकडे असलेल्या कामाची जबाबदारी आता त्यांच्यावर आलेली आहे.

 संघटनेचा गेल्या पाच वर्षे आणि काही महिन्यांचा इतिहास अनेक घटनांनी आणि घडामोडींनी भरलेला आहे. पण बापूंच्या अध्यक्षपदाचा काळा हा त्यांतील सर्वात ऐतिहासिक. बापू शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यवर्षाचे कर्णधार राहिले.

 फेब्रुवारी १९८४ च्या परभणीच्या अधिवेशनांत बापूंची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. संघटनेचे अध्यक्षपद म्हणजे सुळावरची खुर्ची आहे. त्यांत माधवराव खंडेराव मोरे यांचा वारसा सांभाळणे म्हणजे काही तोंडची गोष्ट नव्हे. माधवराव म्हणजे गावागावातील तरुणांच्या हृदयाचे अनभिषिक्त सम्राट. आयुष्याचा अथांग अनुभव, प्रखर बुद्धिमत्ता, खणखणित वैराग्य, अगदी सुलतानी पुढाऱ्यालासुद्धा भिडण्याचा बेडरपणा, सतत नवीन कल्पना, उपमा, शब्दप्रयोग प्रसवणारी प्रतिभा आणि महाराष्ट्राने फार वर्षांत ऐकले नव्हते असे वक्तृत्व. माधवराव नुसते उभे राहिले तरी लाखांच्या सभा स्तब्ध होऊन जात. त्यांच्या वाक्यांच्या एकेका फेकीबरोबर शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या छातीत घालमेल व्हायची.

 बापू जवळ जवळ त्यांच्या अगदी उलट. सभेत बोलणे हेच त्यांना फारसे आवडत नसे. आता बापू फार प्रभावीपणे बोलतात पण पाच वर्षांपूर्वी ते लाउडस्पीकरसमोर यायलासुद्धा टाळायचे. बापूंनी नानांचा वारसा सांभाळायला घ्यायचा म्हणजे कोवळ्या रामचंद्राने शिवधनुष्य उचलायला निघण्याचाच प्रकार.

 बापूंच्या अध्यक्षतेखाली संघटनेने पार पाडलेले कार्यक्रम पहावे; संघटना काय होती आणि कुठे आहे याकड़े नजर टाकावी म्हणजे बापूंच्या कर्तबगारीची खरी साक्ष पटते.

 परभणी अधिवेशनांत शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यवर्षाची घोषणा झाली. कृषि मूल्य आयोग बरखास्त करा, कृषि उत्पादनखर्च आयोग स्थापन करा हे उद्दिष्ट ठरले. त्यासाठी आंदोलनाचा सर्वंकष कार्यक्रम ठरला. त्याची प्रमुख सूत्री: धान्यबंदी, कर्जबंदी, गावबंदी.

 परभणीचे अधिवेशन संपते न संपते तो आंबेठाण येथे पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे शिबीर आटपून चंडीगढ येथील ऐतिहासिक आंदोलनांकरिता मराठी शेतकऱ्यांनी कूच केले.

अंगारमळा \ १९३