पान:अंगारमळा (Angarmala).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंक म्हणजे जुळारी, छापखाना, बाबूलाल आणि वेळ यांच्याशी घेतलेली निकराची झुंज व्हायची. छपाई कामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड संख्येने मुद्रण दोष. मला स्वत:ला मीच लिहीलेला मजकूर छापलेला तपासता येत नाही. लिहीलेली वाक्य मनात इतकी पक्की बसलेली असतात की मुद्रणातल्या चुका लक्षातच येत नाहीत. आणि बाबुलालला कोणत्याच चुका चुका वाटत नाहीत. असा सगळा आनंद. भावी काळातील राजवाडे वारकरीचे अंक घेऊन बसतील तेव्हा मुद्रणदोष ओलांडता ओलांडता वाचताना त्यांच्या डोक्याला मुंग्या आल्याखेरीज राहणार नाहीत. त्यावेळी लिहिलेल्या लेखांपैकी अनेक लेख हे केवळ स्थानिक महत्त्वाचे पण त्याबरोबर 'इंदिरा इंडिया झाली भारताचे वाली कोण', 'इंदिरा गांधींची पहिली गाडी चुकली', 'विचारवंतांचे बुद्धिदारिद्रय', 'एकोणपन्नास कोटीची कर्जमाफी' इत्यादी आजही अनेकांना आवडणारे लेख त्या वेळी प्रसिद्ध झाले. साप्ताहिक वारकरीने संघटनेच्या कामात काय हातभार लावला व काय भूमिका बजावली याबद्दल वेगळे सविस्तरपणे लिहायला पाहिजे. साप्ताहिक 'वारकरी' नंतर 'शेतकरी संघटक' त्यानंतर 'ग्यानबा' हा प्रवाससुद्धा मोठा सूचक आहे. साप्ताहिक वारकरी संघटनेचे मुखपत्र होते. शेतकरी संघटकच्या पहिल्या अंकात 'शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव' मिळू लागले तर या देशाचे दारिद्र्य नष्ट होण्यास वेळ लागणार नाही या विचारांशी फक्त बांधीलकी सांगितली. ग्यानबा त्याहीपेक्षा आणखी स्वायत्त आणि स्वतंत्र रहावा असा आग्रह आहे.

 पहिल्या महिन्यात दोन महिन्यातच साप्ताहिकाच्या आठवडी बाळांतपणाचा मोठा त्रास वाटायला लागला आणि एवढे करून कुणी वाचतं की नाही ही शंका कायमच. २३ जानेवारी १९८० रोजी भामनेरच्या मोर्च्याकरिता मी वांद्रयाला मुक्कामाला जाऊन पोचलो. झोपायच्या आधी तिथली बरीच तरुण मंडळी कुतूहलाने गप्पा मारायला जमली होती. त्यावेळी 'शेतकऱ्यांची संघटना अडचणी आणि मार्ग' ही लेखमाला वारकरीमध्ये प्रसिद्ध झाली होती. यात संघटनेच्या विचाराचा सर्व तथ्यांश येऊन गेला होता. पण ती लेखमाला कोणी वाचते आहे अशी मलाही आशा नव्हती. वांद्रयाचा भोसले नावाचा एक कार्यकर्ता आहे. त्याने बोलता बोलता एकदम वाक्य फेकले. 'ज्या समाजाची प्रगती खुंटली आहे त्याची स्थिती साचलेल्या डबक्याप्रमाणे होते.' मी एकदम चमकलो. या लेखमालेतले हे वाक्य मी चटकन ओळखले व त्याला विचारले, 'हे वाक्य तू कुठे वाचलेस?' तो म्हणाला ‘साहेब हे तुमच्या लेखातले वाक्य आहे.'

अंगारमळा \ १९१