पान:अंगारमळा (Angarmala).pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्गणीदार होतील असा त्यांचा आडाखा. पुढाऱ्यांनी ते कबूलही केले आणि पन्नास रू. रोख दिले. उरलेले पन्नास रू. अजून द्यायचे आहेत. पहिला अंक तर प्रसिद्ध झाला. प्रसिद्धीच्या वेळापर्यंत अंक कसाबसा छापून झाला. बाबूलाल सिद्धहस्त लेखक आहे. अगदी नवे अगदी मूलगामी बोलणारे लिहिणारे मला जे लोक पाच दहा वर्षांत भेटले त्यांच्यात त्याचा अगदी वर क्रमांक लागेल. एका बाजूला जुळवणाऱ्याला हजर करायचे, त्याला एक पाच दहा ओळींचा मजकूर देऊन कामाला लावायचे, तेवढा मजकूर जुळवून होईपर्यंत आणखी पंधरा वीस ओळी लिहून द्यायच्या असे त्याने अनेकवेळा केले आहे. पण त्याचा छापखाना हा व्यंकटेश माडगुळकरांच्या ग्रामीण कथांत शोभून दिसण्यासारखा. सगळे जुळारी हे अर्धवेळ शेती करणारे. आणि त्यापेक्षा जास्त वेळ इतर अनेक भानगडीत अडकलेले. त्यांना बाबापूता करून शोधून बोलावून आणावे लागे तरी ते सारखे निसटून जात. तारीख आणि वेळ यांची जाणीव बाबूलालच्या छापखान्यांत फारशी नाही. लग्नाची तारीख उद्यावर येऊन पडली, आता तरी लग्न पत्रिका द्या म्हणून ग्राहकच त्यांच्याकडे काकुळतीला येऊन बसलेले दिसायचे. चाकणमधला एकुलता एक छापखाना म्हणून त्याच्या सोयीने लग्नाच्या तारखा मागेपुढे कराव्या लागत. गुरुवार सकाळपर्यंत संपादक म्हणून मी मजकूर हजर करायचा असं ठरलं होतं. सगळ्या कामाच्या धादलीत बुधवारी रात्रभर बसून सत्तावीस अठ्ठावीस पानं मजकूर लिहून काढायचा आणि उजाडता उजाडता बाबूलालच्या घर कम छापखान्यासमोर जाऊन उभा राहायचो. बाबूलालची आणखी एक सवय म्हणजे मारूतीच्या देवळात रात्री तीन साडेतीनपर्यंत गप्पा मारायच्या आणि नंतर सकाळी दहावाजेपर्यंत ताणून द्यायची. त्यांच्या बायकोलाही माझ्या येण्याची कटकट वाटत असावी. ती बाबूलालला गदगदा उठवायची, "अहो तुमचा सासरा आलाय बघा." मग दुपारपर्यंत वेळ जुळारी शोधण्यात जायचा. कधी जुळारी मिळायचे कधी मिळायचे नाहीत.

 दुसऱ्या दिवशी सकाळी काम हमखास सुरू होईल असे आश्वासन बाबूलाल द्यायचा आणि एकदा काम चालू झालं की काय हो, दोन तीन तासात अंक तयार असं सांगून माझी चिंता दूर करायचा प्रयत्न करायचा. शुक्रवारी सकाळी पुन्हा मी हजर आणि पुन्हा परिस्थिती तीच. शनिवारी दुपारपर्यंत का होईना अंक कसाबसा तयार करावा ही माझी धावपळ असायची, बाबूलाल घड्याळ काय पण कॅलेंडरकडे सुद्धा लक्ष देणे म्हणजे विलायतेतून आलेल्या लोकांचे फॅड समजायचा. साप्ताहिक वारकरीचा प्रत्येक

अंगारमळा \ १९०