पान:अंगारमळा (Angarmala).pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि संपादक शरद जोशी आणि कार्यकारी संपादक बाबूलाल परदेशी. पहिल्या अंकाचा प्रकाशन समारंभ करायचा ठरला. आज त्या प्रसंगाची आठवण आली तरी करमणूक झाल्याखेरीज राहात नाही. चाकण बाजारात एका ठिकाणी लहानसा मांडव घातला. कार्यकत्यांच्या पैकी कुणाच्या तरी ओळखीने एक लाऊड स्पिकरपण लावला. उद्घाटन समारंभाच्या वेळी संघटनेच्या सगळ्या कार्यकत्यांनी संघटनेचे असे काही चिन्ह लावावे, म्हणजे नंतर कांद्याचा बाजार चालू झाला की संघटनेचे कार्यकर्ते वेगळे दिसून यावेत अशी सोयही होऊन जाईल. कल्पना तर निघाली. एका बाजूला अंक तयार होत होता. दुसऱ्या बाजूला जाहिराती गोळा करणे चालले होते. आणि आम्ही शेतकरी संघटनेच्या चिन्हाचा काही नकाशा, आराखडा न बनवता चोवीस तासांत शंभर दोनशे बिल्ले मिळवायला निघालो. बाबूलाल परदेशीचे सगळे संपर्क जुन्या समाजवाद्यातले. चाकणच्या मामा शिंद्यांपासून ते पुण्याच्या डॉ. रमेशचंद्र ते मोहन धारियापर्यंत. डॉ. रमेशचंद्र समाजवादी पक्षातले मोठे संघटक मानले जायचे. त्यांच्याकडे आम्ही विचारायला गेलो बिल्ले कसे व कोठे तयार करायचे. डॉ. साहेब भेटलेच नाहीत. मला वाटते त्यांच्या धाकट्या भावाचा प्लॅस्टिक मोल्डींगचा छोटासा उद्योगधंदा होता. तो बाहेर पडता पड़ता भेटला. त्याला आमचं काम समजावून सांगितल्यावर, तो म्हणाला की प्लॅस्टिकचे बिल्ले तो दोन तीन दिवसांत बनवून देऊ शकेल. बिल्ला कसा असावा? त्यावर शेतकरी संघटना हे शब्द असावेत आणि रंग फक्त तांबडा आणि पांढरा असावा एवढंच काय ते आमच्या डोक्यात स्पष्ट होतं. अक्षरांची बांधणी किंवा मांडणी कुणाकडून तरी करून घेऊन मंजूर नामंजूर करायला वेळच नव्हता. आम्ही हे काम रमेशभाईंच्या भावाकडं सोपवलं व निघालो. त्या वेळी तयार झालेल्या प्लॅस्टिकच्या बिल्ल्याचे काही नमुने आजही उपलब्ध आहेत, पण शेतकरी संघटनेचे ते तांबडे गोलाकार प्रतिक आज जगभर प्रसिद्ध झाले आहे. आणि लक्ष्यावधींना स्फुर्ति देत आहे. संघटनेच्या मुखपत्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोण येणार? खासदार आमदार तर सोडाच अगदी पंचायत समितीचा सभापतीसुद्धा या कार्यक्रमाला यायला तयार झाले नसते. शेवटी आंबेठाण जवळच्या एका गावातील पंचायत समितीच्या एका सदस्याच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. दुसरे कुणी आले नसते हेही खरेच, पण त्याबरोबर पंचायत समितीचा हा मेंबर भामनेरच्या सडकेच्या आंदोलनात उपयोगी पडेल अशी थोडीफार आशा असावी. बाबूलाल परदेशीच्या कल्पना जास्त व्यवहारी, हे पुढारी निदान शंभर रू. देऊन आजीव

अंगारमळा \ १८९