पान:अंगारमळा (Angarmala).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चाकणच्या परिसरातील शंभर दिडशे गावात अंक पोचला पाहिजे. तिथे नुसता अंक पोचून उपयोगी नाही, तो वाचला गेला पाहिजे. चाकणच्या पश्चिमेकडील मावळ खोऱ्यामध्ये साक्षर माणसांचा दुष्काळच, मग गावोगावी तो अंक वाचून दाखविणाऱ्या माणसांची योजना पाहिजे. अशा सगळया कल्पनांनी साप्ताहिक काढायचे ठरले. ऑक्टोबर संपत आलेला. दोन एक महिन्यात कांद्याचा हंगाम सुरू होणार. एवढ्या काळांत सर्वकाही खटाटोप आटोपून अंक चालू करणे आणि तो गावागावात उभा करणे हे अशक्यच होते. दिल्लीहून नावाची मंजूरी यायलाच कितीतरी महिने लागतात. मग काय करावे ? बाबूलाल परदेशी हा पट्टीचा वक्ता तर आहेच, पण चाकण आळंदी परिसरात बरीच वर्षे नट आणि किर्तनकार म्हणूनही गाजत आहे. चाकणला झालेल्या 'संत तुकाराम' या नाटकाच्या प्रयोगाने खूपच उत्साह तयार केला होता. बाबूलालच्या वडीलांनीसुद्धा कीर्तनकार मुलाला साष्टांग नमस्कार घातला. देहू आळंदीच्या या परिसरात बाबूलालचा चांगला मान होता. कधीतरी पुढे मागे एक भक्तीमार्गी साप्ताहिक काढावे अशी त्यांची कल्पना होती. हे साप्ताहिक प्रामुख्याने आजीव सदस्यांनी दिलेल्या देणगींच्या व्याजातून चालेल असा आडाखा होता. या दृष्टीने 'साप्ताहिक वारकरी' या नावाला त्याने दिल्लीहून मान्यता आणून ठेवली होती. तशी मान्यता येऊन दोनतीन वर्ष होऊन गेली होती. पण साप्ताहिक चालू करायला बाबूलालला काही फुरसत नव्हती. त्याने साप्ताहिकाचे नाव आम्हाला देऊ केलं. शेतकरी संघटनेकरिता काढलेले साप्ताहिक आणि त्याचं नाव 'वारकरी' हे थोडं खटकलं आणि माझ्यासारख्या नास्तिकाला तर विशेष खटकलं. पण साप्ताहिक तातडीने चालू करण्याची इतकी निकड होती की काही काळ का होईना याच नावाखाली साप्ताहिक काढायचं ठरलं. निर्णय झाला. ३ नोव्हेंबर १९७९ रोजी पहिला अंक निघाला. २७ ऑक्टोबरला साप्ताहिक काढायचा विचार मनात आल्यापासून सात दिवसाच्या आत पहिला अंक प्रकाशित होतो हे अगदी मराठी पत्रकारितेतसदा मोठे दुर्मिळ असले पाहिजे. अंक निघायचा डेमी फुलसाईज या आकाराचा चारपानी. बाबूलाल परदेशींचा छापखाना. त्यांच्या छपाई यंत्राच्या सोयी प्रमाणे आकार वगैरे. पैशांची अडचण पहिल्यापासून असल्याने चाकणच्या बाजारपेठेतील आडते, तेल गिरण्या अगदी किराणामालाचे दुकानदार यांच्यासुद्धा जाहिराती घेतल्यावाचून गत्यंतर नव्हते. पण या 'साप्ताहिक वारकरी'ची भूमिका फार काटेकोरपणे ठरविण्यात आली होती. पहिल्या अंकापासून ते शेतकरी संघटनेचे मुखपत्र आहे हे अगदी स्पष्ट करण्यात आले. मुद्रक प्रकाशक

अंगारमळा \ १८८