पान:अंगारमळा (Angarmala).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'गुड स्टोरी टेलर' म्हणून करतात. अनिलच्या या सगळ्या धावपळीत वेळ मिळेल तेव्हा त्याच्याच आसपासच्या लोकांनी ही शब्दचित्रं कधी तरी शब्दांकित करायला पाहिजे. मराठी साहित्यक्षेत्रातही त्यामुळे खळबळ उडेल.

 मागच्या आठवणी सांगताना अनिलच्या संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता असतांनाच्या आठवणी मन हेलावून सोडणाऱ्या असतात. खिशात पैसा नाही, जेवणा राहण्याची सोय नाही. राहाण्याची सोय दुसऱ्या कोणत्यातरी कार्यकर्त्यांच्या घरी केलेली. पोटात भुकेचा डोंब उसळलेला. पण ज्या घरी अकस्मात जायचे त्या घरी जेवायला थांबायचे आमंत्रण मिळेल की नाही याची खात्री नाही. अशा परिस्थितीत जेवणाचे आमंत्रण लावून घेण्याकरिता काय काय युक्त्या कराव्या लागतात याचे प्रत्यक्ष वर्णन अनिलच्या तोंडूनच ऐकायला पाहिजे.

 थोड्या लोकांना माहित असलेला अनिलचा एक छंद म्हणजे कोर्टात केस लढवणे. धुळ्याच्या कोर्टात पुढाऱ्यांची लफडी काढण्याकरिता त्याच्या काही ना काही केसेस चालूच असतात. मुंबई हायकोर्टातही त्याचे अनेक रिट पिटीशन चालू असायचे. संघटनेच्या कामाला लागल्यापासून हे खटला प्रकरण थोडे कमी झाले आहे. कमी झाले म्हणण्यापेक्षा त्याचे स्वरूप बदलले आहे. आता त्याचे लक्ष असते संघटनेच्या खटल्यांकडे. प्रसिद्ध कायदेपंडित राम जेठमलानी यांच्याबरोबर काम करणे सोपे नाही. पण अनिल म्हणजे त्यांच्या गळ्यातला अगदी ताईत. तसे म्हटले तर अनिलला इंग्रजी अगदी जुजबी येते. पण राम जेठमलानी आणि अनिल एकमेकांशी गप्पा मारत असले म्हणजे फार जुन्या काळचे दोस्त भेटत असावे असे वाटते. मोठमोठ्या माणसांबरोबर स्नेह संबंध जोडणे ही त्याची एक हातोटी आहे. छगन भुजबळ असोत की बाळ ठाकरे, दत्ता सामंत असोत की व्ही.पी. सिंग आणि शंकरराव चव्हाण असोत की शरद पवार या सगळ्या मंडळींना अनिलविषयी आपुलकी आहे. यांचे सर्वांचे दरवाजे अनिलकरता कायमचे खुले असतात.

 पण बाहेरचा असा अफाट, रांगडा, राक्षस अनिल घरी परतला म्हणजे अगदीच वेगळा दिसतो. यात खरे कौशल्य हेमावहिनींचे आहे. अगदी अगत्यशील गृहीणीची जबाबदारी हेमावहिनी सतत हसतमुख राहून सांभाळतात. त्यांच्या सतत आनंदी स्वभावाचे रहस्य काय असावे? मला वाटते बाहेरून काळ्या कभिन्न पत्थरासारख्या भासणाऱ्या अनिलच्या मनात आत कुठेतरी भावनेचा आणि प्रेमाचा झरा वहात असला पाहिजे. वहिनींना त्याची जाणीव सगळ्यात जास्त असली पाहिजे. अनिलच्या

अंगारमळा \१८५