पान:अंगारमळा (Angarmala).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कामगिरी एखाद्या लष्करी कारवाईसारखी होती आणि ती अनिलने शंभर टक्के यशस्वी करून दाखवली. संघटनेच्या सगळ्या मोठ्या लढायात अनिल एकटाच एका सबंध रणगाड्याच्या दळाचे काम बजावत आला आले.

 पण अनिल म्हणजे नुसता कामाचा राक्षस नव्हे. त्याच्या अंगी प्रचंड धाडसही आहे. जीवावर धोका येण्याची तयारीही आहे. संघटनेत येण्यापूर्वी अनिलवर सात बसेस जाळल्याचा आरोप होता. मंत्रीमहाशय वर्तक यांच्या श्रीमुखात ठेवून दिल्याबद्दल त्याला शिक्षा झाली होती. भर सभेत मंत्र्याच्या गळ्यात जोड्यांचा हार घालण्याचा आपला निर्धार त्याने पुरा करून दाखवला होता. संघटनेच्या कामात त्याच्या जेम्सबाँड प्रवृत्तीचा अनुभव अनेकदा आला आहे. विदर्भात कापूस आंदोलन सुरू झाले होते. मला रासुकाखाली अटक झाली होती. अनिलच्या धुळ्याच्या राहत्या घरी पोलिसांनी पहारा बसवला होता. या पहाऱ्यातून सुटण्याकरिता त्याने जी युक्ती वापरली ती कोणत्याही रहस्यकथेत शोभून दिसण्यासारखी आहे. पण त्याच्या या सगळ्या धाडसाच्या गोष्टी आजच प्रकाशात आणणे शक्य होणार नाही. अनिलच्या धाडसाच्या रम्य आणि सुरस कथा प्रकाशित करण्यापूर्वी दहा-पंधरा वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागेल.

 सगळ्या आडदांडपणाबरोबर अनिलमध्ये एक छुपा बहिर्जी नाईक आहे. नाव बदलून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आल्याचा उल्लेख मी केलाच आहे. अगदी कडक बंदोबस्तात तुरुंगात असतांना ॲडव्होकेट म्हणून अनिल मला भेटायला आला आहे. सल्लामसलत करून गेला आहे. सूचना देऊन आणि घेऊन गेला आहे.

 या सगळ्या कथा खरे म्हटले तर अनिलच्या तोंडूनच ऐकायला पाहिजेत. तासन्तास चाललेल्या गाडीच्या प्रवासात अनिल स्वत:च्या या करामती मोठ्या रोमहर्षकपणे सांगतो. स्वत:च्याच गोष्टी असे नव्हे. त्याच्या आसपासच्या अनेक व्यक्तींच्या गोष्टी तितक्याच खुमारीने सांगतो. या अफाट माणसाभोवती आयुष्यात वेळोवेळी आणि जागोजागी तितकीच भन्नाट माणसे येऊन गेली. अनिलचे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचे कसब काही विलक्षण आहे. मला अनेकदा असे वाटायचे की हा कल्पनारंजीत कथा सांगतो. पण दोनतीन वेळा तपास करून पाहिल्यानंतर त्यात अतिशयोक्तीचा काही प्रकार नाही असे माझ्या लक्षात आले. शेवटी अनिल हा व्यवसायाने पत्रकार आहे. साधासुधा पत्रकार नाही. एका एका वर्षात तीन तीन पुरस्कार मिळवलेला पत्रकार आहे. इंग्रजीमध्ये अनेक मोठ्या लेखकांचा उल्लेख

अंगारमळा । १८४