पान:अंगारमळा (Angarmala).pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हतात्मा बाबू गेनू स्मृती दिन १२ डिसेंबर १९८५ रोजी डॉ. दत्ता सामंत यांच्या सहकार्याने मुंबईच्या शिवाजी पार्कवर घेण्याचे ठरले. अनिलने पुन्हा एकदा वाळवंटात राजवाडा उभा करून दाखवला. सगळी मुंबई रंगवून काढली. छगन भुजबळांना व दत्ता सामंतांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा चमत्कार करून दाखवला. विदर्भ मराठवाड्यातून आलेल्या हजारो स्त्री पुरुषांची मुंबईत राहण्याची सोय केली. प्रत्यक्ष शिवतीर्थावर उभे केलेले व्यासपीठ अनेकांच्या स्मरणात असेल.

 १९८७ च्या ठिय्या आंदोलनाची जबाबदारी पार पाडली ती पुन्हा अनिल गोटेनेच. कार्यकारीणीने त्याची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. अध्यक्षपदाच्या काळात तर सटाणा, धुळे, नागपूर आणि शेवटी सांगली येथे भरलेले मेळावे म्हणजे त्याच्या कर्तबगारीच्या चढत्या पताकाच होत्या.

 सांगलीचा मेळावा म्हणजे खरोखरच अनिलच्या सर्व कामगिरीवर चढलेला सोन्याचा कळस होता. यापुढे आणखी मोठे मोठे कळस तो चढवील, याहूनही उत्तुंग शिखरे पादाक्रांत करील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. पण तरीही सांगलीच्या यशाचे असे एक खास स्थान कायमचे राहील.

 वसंतदादा पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या वादात शेतकरी संघटनेला विनाकारण ओढले. माझ्यावर आणि व्ही.पी. सिंगांवर विनाकारण चिखलफेक केली आणि राष्ट्रीय नावाची शेतकरी संघटना काढून एक मोठा यक्षप्रश्न उभा केला. दादांच्या संघटनेला भवितव्य असे नाही हे उघड. शेतकरी संघटना ही काही आडमाप घोषणांनी उभी राहणारी गोष्ट नव्हे. संघटना उभी करण्याकरितां शेकडो हजारो कार्यकर्त्यांचे अश्रू, घाम आणि रक्त लागत असते. पण वसंतदादांबद्दल पुष्कळ शेतकऱ्यांच्या मनात ओलावा आहे. स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही त्यांच्याविषयी आदर आहे. राष्ट्रीय शेतकरी संघटनेची जखम चिघळत ठेवणे त्रासाचे ठरण्याचा धोका होताच.

 सांगली, कोल्हापूर भागात शेतकरी संघटनेचे काम कमकुवतच, जवळ जवळ नसल्यासारखेच. याही परिस्थितीतच अनिलने महाचमत्कार घडवून दाखवला. अनिल सांगलीला गेला. तालुक्यातालुक्यात गेला. संभाजीराव पवारासारखे कार्यकर्ते जमा केले आणि वसंतदादांचो मेळावा झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत सांगलीमध्येच महाप्रचंड मेळावा भरवून एक मुंहतोड़ जवाब देऊन टाकला. बस, त्या दिवसापासून राष्ट्रीय शेतकरी संघटनेचे नावसुद्धा कुठे येईनासे झाले. सांगलीतील मेळाव्याची

अंगारमळा । १८३