पान:अंगारमळा (Angarmala).pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कधीच ऐकले नाही. मलाच वाटणाऱ्या धास्तीपोटी काहीवेळा मी त्याचे कष्ट कमी व्हावे याकरितां काही सूट देऊ करतो. अमुक गोष्ट नाही केली तरी चालेल तमुक एक गोष्ट जमण्यासारखी नसल्यास सोडून दे. अनिल अशा सूचना त्याच्या आडदांड पद्धतीने धुडकावून लावतो. कार्यक्रम पार पडला पाहिजे, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पार पडला पाहिजे, संघटनेच्या यशात दैदिप्यमान भर पडेल असे तऱ्हेने पार पडला पाहिजे. याच्याबद्दल त्याचा विशेष आग्रह असतो आणि अनेक वेळा मी मांडलेल्या मुळच्या प्रस्तावापेक्षा पुष्कळ वेगळा, अधिक व्यापक, अधिक महत्त्वाकांक्षी आणि म्हणून तो अधिक जिकीरीचा आणि त्रासाचा कार्यक्रम स्वत:च पुढे मांडतो, हे सगळे कसे काय व्हायचे? तर त्याचे उत्तर ठरलेले, 'त्याची काळजी तुम्ही करू नका.' आणि अनिलने असे आश्वासन दिले की मीही निर्धास्त होऊन माझ्यावर जी कामगिरी सोपवली ती पार पाडण्याच्या मागे लागतो.

 साकडे मेळाव्यानंतर परभणी अधिवेशन झाले. त्यानंतर चंदीगड आंदोलन, पश्चिम महाराष्ट्र मोटरसायकल प्रचारफेरी. सर्व महाराष्ट्रातील महिन्याभराची प्रचार यात्रा. या सगळ्या कार्यक्रमांचा सेनापती अनिल गोटे. प्रचार यात्रेच्या शेवटच्या दिवशीच इंदिरा गांधींची हत्या झाली. सगळे राजकीय चित्र क्षणार्धात पालटले. गावबंदी कार्यक्रमाच्या आधाराने उभी केलेली रणनीती भुईसपाट झाली. शेतमालाच्या भावसबंधी शेतकऱ्यांच्या मनांत जळत असलेल्या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाला तोंड न देता इंदिरा काँग्रेसचे एक सोडून सगळे उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाले. निदान विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आयला थोडा फार लगाम घातलानाही तर पाच वर्षांपर्यंत तरी संघटनेची सगळी आंदोलने, कार्यक्रम बंद ठेवायला लागतील, एवढेच नव्हे, तर संघटनेला काम करणेसुद्धा अशक्य होईल असे दारुण चित्र दिसू लागले. या परिस्थितीत विचार करण्यासाठी अधिवेशन घ्यायचे ठरले. शेतकरी संघटनेचे अधिवेशन म्हणजे काही थोडी जबाबदारी नाही. सटाण्याच्या अधिवेशनाची तयारी किती तरी महिने आधी चालू होती. परभणी अधिवेशनाचीही तीच स्थिती खर्चाकरिता पैसा उपलब्ध झाला तरी सगळी कामे व्यवस्थित व वेळेत उरकून घेणे म्हणजे उरफोड काम. अनिलने धुळ्याला अधिवेशन भरवण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पार पाडून दाखवली.

 सहा जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी राजीव शासनाचे नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आणि शेतकरी संघटनेच्या इतिहासातील कापूस पर्वाला सुरूवात झाली

अंगारमळा ।१८२