पान:अंगारमळा (Angarmala).pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठे काहूर उठवले. माझ्या ब्राह्मण जन्मावर बोट ठेवून मी छुपा आरएसएसचा मनुष्य आहे असा प्रचार त्यांनी बऱ्याच दिवस चालवला होता. विठोबापुढे जाण्याच्या कल्पनेने त्यांचे चांगलेच फावले आणि त्यांनीही संघटनेविरुद्ध विष पेरायला सुरूवात केली. सरकारी बंदी विरूद्ध हायकोर्टात जाणे, ती बंदी उठवून घेणे त्या करिता जिल्हाधिकाऱ्याशी बोलणी करणे ही सगळी कामं अनिलने पार पाडली. गावोगाव खेड्यात जाऊन प्रचार करण्याचे काम अनिल जितक्या सहजतेने पार पाडतो तितक्याच सहजपणे तो हायकोर्टातील दालने, वकील मंडळी, कायद्याची कलमे यातून भ्रमण करतो.

 सोलापूर जिल्ह्यात जायची त्यावेळी त्याच्यावरही बंदी होती. पण एखाद्या बहिर्जी नाईकाप्रमाणे तो वेगळ्या नावाखाली खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा भेटून आला. बंदी उठली ती मेळाव्याआधी आठ दिवस. आठ दिवसात अनिलने आकाशपाताळ एक केले. पंढरपूरकडे जाणाऱ्या साऱ्या रस्त्यांच्या बाजूच्या भिंती रंगवून घेणे हे काही काम साधे नाही. खुद्द पंढरपुरातील प्रचंड वाड्यांच्या भिंती त्याने अशा रंगवून घेतल्या की कार्तिकी यात्रेचे सगळे वारकरी पाहातच राहिले. त्यावेळी पंढरपुरात संघटनेचे काम असे काहीच नव्हते. सगळे बाहेरून नेऊन कामे करवून घ्यावी लागत होती. कोपरगावचा बद्री देवकर याच वेळी पंढरपुरला जाऊन बसला. जतचे महाराज बादलीभर खळ घेऊन भित्तीपत्रक चिकटवायच्या कामाला लागले. या काळांत जीपमधील उकळते पाणी पडून अनिलची सगळी पाठ भाजून निघाली. दुसरा कुणीही मनुष्य सरळ इस्पितळांत दाखल झाला असता इतका तो भाजला होता. अनिलच्या मनात असा विचारही आला नसावा. साकडे मेळाव्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याने शर्ट काढून बँडेजने भरलेली पाठ मला दाखवली. साकडे मेळाव्याच्या प्रचंड यशाने आम्ही त्यावेळेस काहीसे ढगात होतो. अनिलची भाजलेली पाठ पाहिल्यावर या यशामागे काय वेदना आणि परिश्रम होते याची मोठी विदारकपणे जाणीव झाली. पंढरपुरचा साकडे मेळावा म्हणजे संघटनेच्या या राक्षसाने आठ दिवसात उभा केलेला अप्रतिम महालच होता.

 हे असे चमत्कार एका माणसाने किती वेळा करून दाखवावे? काहीही कठीण काम दिसले किंवा समोर आले म्हणजे अनिलवर ते टाकून मी मोकळा होतो. आणि अनिलच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही. कोणतीही कल्पना समोर मांडली की त्यातल्या अडचणी काढून ते कसे व्हायचे असे रडगाणे अनिलच्या तोंडून मी

अंगारमळा \ १८१