पान:अंगारमळा (Angarmala).pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'अनिल' जादूच्या दिव्यातील राक्षस


 संघटनेचे अनेक कार्यकर्ते अनिलविषयी बोलतांना त्याला राक्षस किंवा महाराक्षस म्हणतात. त्याच्याबरोबर काम करतांना तहान नाही, भूक नाही, तीन तीन, चार चार रात्री झोप नाही, अफाट धावपळ याचा अनुभव त्यांनी सगळ्यांनी घेतलेला आहे. बाकी सगळे कार्यकर्ते थकून गळून पडायला आले तरी अनिल आत्ताच कामाला लागल्यासारखा टवटवीत दिसत असतो. आणि बाकीच्या कर्यकर्त्यांचा त्याच्या रांगड्या भाषेत उद्धार करीत असतो. अनिलची कामाची पद्धत जशी राक्षसी तशीच विश्रांतीचीही पद्धत राक्षसी. सगळं काम आटोपलं म्हणजे सगळ्या दिवसांच्या झोपेची भरपाई तो एका दमात करून टाकतो.

 संघटनेच्या दृष्टीने मात्र अनिल अरबी सुरस कथातील दिव्यातील राक्षसाप्रमाणे आहे. अरबी कथात दिवा घासला गेला म्हणजे एक राक्षस प्रकट होतो आणि दिव्याच्या मालकाची कोणतीही इच्छा तो क्षणार्धात पुरी करून टाकतो. राक्षसाला सांगितलेले काम भर वाळवंटात मनसोक्त मेजवानीची सोय करण्याचे असो कां कोण्या बेटावर हिऱ्या मोत्या पाचूंनी मढवलेला राजवाडा अर्ध्या रात्रीत उभा करण्याचे असो. दिव्याच्या राक्षसाला अशक्य असे काहीच नाही. संघटनेचे काम म्हटले की अनिलला अशक्य असे काहीच नाही.

 गेल्या पाच वर्षात या राक्षसाने इतके प्रचंड महाल उभारून दाखवले आहेत की, आज नुसती आठवण करायला गेलो तरी कुणीही आश्चर्याने चकीत होऊन जाईल. पंढरपूरचा साकडे मेळावा जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य शासन त्यावेळी शेतकरी संघटनेला झोडपूनच काढायला उठले होते. संघटनेचा कोणताही कार्यक्रम म्हटला की त्यावर बंदी यायचीच. एकदा कोणत्या का निमित्ताने होईना शेकऱ्यांना निर्भयपणे एखाद्या मेळाव्यात येता येईल असे करणे आवश्यक झाले होते. विठोबासमोर साकडे घालण्याची कल्पना या आवश्यकतेतून निघाली. विठोबापुढे जायचे म्हटल्यावर शासन बंदी घालणार नाही अशी कल्पना होती. ती खोटी ठरली. शासनाने बंदी घातली. मला सोलापूर जिल्ह्यात जायचीच बंदी घालण्यात आली आणि आता हा कार्यक्रम होऊ शकणार नाही, जास्तीत जास्त जिल्हा बंदी मोडून स्वत:ला अटक करून घेता येईल असे दिसू लागले. उलट्या बाजूने डाव्या चळवळीतील लोकांनी

अंगारमळा । १८०