पान:अंगारमळा (Angarmala).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लावतील.

 गावागावांत आरोग्यसेवा नाहीत, त्यासाठी गावोगावी दाईसुईणींचे जाळे तयार करण्याच्या व्यापक योजना मांडणारे अनेक महाभाग मला भेटले आहेत. या पंचवीस वर्षांत, अगदी बाजाराच्या गावीसुद्धा, दहावीस एमडी/एमएस डॉक्टर, दंतवैद्य, नेत्रतज्ज्ञ, पॅथलॉजिस्ट यांची गर्दी उसळली आहे. गंमत अशी, की अजूनही हे महाभाग आपापल्या संस्थांचे देशीपरदेशी परिसंवाद भरवीत असतात. आपण हाती घेतलेला प्रश्न व्यावहारिक भविष्यकाळात तरी सुटणे शक्य नाही, अशा गृहीत तत्त्वावर बहुतेक स्वयंसेवी संघटना चालतात. तो प्रश्न नाहीसा झाला, तरी त्यांच्या सेवांची गरज संपलेली नाही, उलट त्यांच्या सेवेला एक नवीन परिमीती लाभली आहे, असे ते आग्रहाने मांडतात.

 एके काळी कुष्ठरोग ही एक महाभयंकर समस्या होती. महात्मा गांधींनी कुष्टरोग्यांची सेवा करण्याचे काम सुरू केले, त्यातून अनेकांनी स्फूर्ती घेतली; आपापले आश्रम, नगरे, वने स्थापली. उदंड सरकारी आणि खाजगी निधी मिळवले; पण, कुष्ठरोग मुळातूनच नष्ट करण्यासाठी लागणारे संशोधनाचे कार्य कोणी हाती घेतले नाही. कोण्या अनामिक संशोधकाने ते केले. त्यामुळे कुष्ठरोग आता साध्य बनला. त्याची किळसही फारशी राहिली नाही; पण, तरी त्यांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या महात्म्यांच्या धुपारत्याशेजारत्या चालूच आहेत. कुष्ठरोग संपला तर दुसऱ्या कोणाच्या सेवेचे काम घेऊ! कोणा दुष्टाने हा कुष्ठरोग संपवला कोण जाणे! पण, त्यामुळे आमच्या विभूतीतील ज्वाला आणि फुले संपली नाहीत, असा त्यांचा निर्धार आहे.

 अलीकडे स्वयंसेवी संस्थांना एक नवे कुरण सापडले आहे, ते एड्स रोगाशी सामना करण्याचे सरकार या कामासाठी करोडोंनी रुपये वाटत आहे. भंडारा जिल्ह्यातील एक जुना कार्यकर्ता अलीकडे मला भेटला होता. तो आता स्वयंसेवी संस्थांच्या बरकतीच्या धंद्यात बस्तान मांडून आहे. अलीकडेच त्याला एड्ससंबंधी एक मोठा सरकारी प्रकल्प मिळाल्याचे त्याने मला मोठ्या आनंदाने सांगितले, मी त्याचे कौतुकही केले. परंतु माझ्या मनातील शंकाही मी त्याला सांगितली. लोकसंख्या आटोक्यात राहावी यासाठी कुटुंबनियोजनाच्या झेंड्याखाली गर्भाचा आईच्या पोटातच नाश केला जातो. याउलट, म्हाताऱ्यांना मात्र अत्याधुनिक लाईफ सपोर्ट सिस्टिम वापरूनही जिवंत ठेवण्याचा आटापिटा चालतो. वृद्धांना समाजात आदराचे स्थान दिले गेले पाहिजे, त्यांना पूर्वीच्या काळाप्रमाणे. 'काशीमरणा'साठी सोडून चालणार नाही हे मान्य आहे. पण लोकसंख्यानियंत्रणासाठी जो जन्माला येईल, त्याला अखेरपर्यंत समाजाने खाऊ घालावे,

अंगारमळा । १७५