पान:अंगारमळा (Angarmala).pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याग करण्याची जेथे तयारी अधिक, ते देश प्रगती करतात असा त्यांचा विश्वास असतो. राष्ट्रप्रेमाची निर्मिती हा अशा मंडळींच्या मते, देशाच्या थोरवीचा एकमेव मार्ग असतो. राष्ट्र, धर्म, जाती, इतिहास, पूर्वजांची थोरवी आणि त्याहीपेक्षा दुसऱ्या एखाद्या जातीजमात-राष्ट्राचा विद्वेष अशा गोष्टींच्या आधारे माणसाच्या आणि समाजाच्या अस्मितेला गोंजारले, त्यांच्या अहंकाराला जोपासले की त्यातून निर्माण होणारे चैतन्य हीच विकासाची खरी ऊर्जा अशा भावनेपोटीच इतिहासभर अनेक प्रसिद्ध पुरुषांनी राष्ट्रभावनांना हाक घातली. प्रचंड युद्धे घडवून आणली, लक्षावधींच्या कत्तली केल्या, मुलूखच्या मुलूख बेचिराख केले; पण एकालाही सतत, धीमेपणे, पावलापावलाने का होईना, प्रगती करणारे समाज तयार करता आले नाहीत.

 मी जरी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतीचा प्रश्न मांडत आलो असलो, तरी शेतीचा प्रश्न मी एका दरवाज्याची किल्ली म्हणून वापरला आहे; शेतीमालाच्या भावाचे तत्त्वज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र करण्याची गुरुकिल्ली म्हणून मी वापरले आहे. मी मुळात स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. गरिबीचे नाव घ्यायचे, गरिबी हटवायची म्हणायचे आणि गरिबी-निर्मूलनाचे वेगवेगळे कार्यक्रम काढून आपलेच खिसे भरून घ्यायचे हे मी केले नाही.

 मी माझा विचार मांडत असताना माझी निळी जीन सोडायला तयार नाही. सुरुवातीच्या काळात शेतकरी संघटनेच्या सभेत प्रस्ताविक करणारे सांगत, "शरद जोशी परदेशात होते. इतका पगार मिळत होता. ते सगळं सोडून शेतकऱ्यांची कीव आली म्हणून ते हिंदुस्थानात परत आले." पहिल्या सभेपासून मी भाषणाच्या आरंभीच सांगत होतो, "मी करुणेच्या पोटी आलेलो नाही. मी सत्यशोधनाकरिता आलेलो आहे आणि या कामात आनंद मिळतो म्हणून काम करतो आहे. हा आनंद जोपर्यंत वाटणार आहे तोपर्यंत मी काम करणार आहे."

 एका माणसाने दुसऱ्याकरिता करुणेपोटी काम करावे हे दोघांनाही घातक आहे, असे मी मानतो. मी जर का सुरुवातीलाच डोळ्यांतून पाण्याचे चार थेंब गाळीत मांडणी केली असती तर, माझी खात्री आहे, मी आतापर्यंत 'महात्मा' पदवीला पोहोचलो असतो; पण हे मी जाणीवपूर्वक टाळत आलो. एवढेच नव्हे तर, शेतकरी समाजाचे पूज्य संत ज्ञानेश्वर, तुकाराम या दोघांच्या विरुद्धची शिकवण आम्ही आमच्या शिबिरांत देतो. कारण, समाजाला एका विवेकाच्या पायरीवर आणून ठेवायचे आहे. त्यामुळे, कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारत नाही.

अंगारमळा । १७१