पान:अंगारमळा (Angarmala).pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सुनामीच्या बाबतीत तर एक प्रकरण सांगण्यासारखे आहे. सुनामीची लाट आली त्याआधी तमीळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमारांची हालत मोठी दयनीय झाली होती. मच्छीमारीच्या यांत्रिक बोटींशी स्पर्धा करता येत नसल्याने छोट्या होड्यांचे कोळी मच्छीमारीच्या धंद्यातून दूर कसे होता येईल याची चिंता करीत होते. त्यांना सुनामी ही इष्टापत्तीच वाटली. आता नवीन व्यवसाय करता येईल, नुकसानभरपाईदाखल काही रक्कम मिळाली तर त्याचा नवीन व्यवसायात प्राथमिक भांडवल म्हणून उपयोग होईल, असा विचार ते करीत होते. पण, सुनामीनंतर प्रेतांची वासलात लावल्यावर, हवा श्वसनीय झाल्यावर स्वयंसेवी संघटनांची लाट येऊन आदळली. जी ती संघटना कोळ्यांना मच्छीमारीच्या नव्या बोटी देण्याच्या धांदलीत. परदेशातील नावा बांधणाऱ्यांचा धंदा बुडीत आला होता, त्यांचा जुना साठा साफ झाला आणि तामीळनाडू व केरळ येथील मच्छीमार पुन्हा एकदा बोटी आहेत; पण पकडायला मासे नाहीत, म्हणून समुद्रात खोलवर जाऊन शेजारी राष्ट्रांचे कैदी बनू लागले. स्वयंसेवी संस्थांचे सुनामीपूर्व आणि सुनाम्योत्तर ताळेबंद पाहिले तर स्वयंसेवी संघटनांच्या उदात्त आणि निःस्वार्थ कार्याचा बुरखा टरटरा फाटून जातो.

 कुटुंबावर, गावावर, समाजावर, जातीवर, धर्मावर, देशावर संकट कोसळताच माणसांमध्ये एका चैतन्याचा संचार होतो. 'Wealth of Nation' प्रसिद्ध ॲडम स्मिथने तुलनेने अप्रसिद्ध 'Theory of Moral Sentiments' मध्ये या चेतनेचे विश्लेषण केले आहे. त्या चैतन्याच्या भरात माणसे अद्भुत कामे करून जातात; पण हे चैतन्य आणि त्यासाठी करायच्या कष्टांची आणि बलिदानाची तिरीमिरी अल्पजीवी असते.

 आपत्ती ओढवली असता वाटेल त्या त्यागास, बलिदानास तयार करणारे चैतन्य ही एक प्रकारची उन्मादावस्था असते; मनुष्यप्राणी आणि समाज यांच्या जीवनाचा तो स्थायीभाव असू शकत नाही. सर्वसामान्य माणसांना जगायचे असते, आयुष्याचा अनुभव घ्यायचा असतो, सुखांचा उपभोग घ्यायचा असतो. अशा सुफल आयुष्याची शक्यता जिवंत राहावी यासाठी, आवश्यक पडल्यास, संकटकाळी तो सर्व हिशेब बाजूला ठेवून स्वत:ला झोकून देण्यास तयार होतो. बेफाम उन्मत्त चैतन्याचा हा अनुभव मोठा स्फूर्तीचा स्रोत असतो. पण, असे चैतन्य आणि बलिदान ही जीवनशैली होऊ शकत नाही.

 दुर्दैवाची गोष्ट अशी, की बहुतेक हुकुमशहांना आणि अनेक क्षुद्रवादी नेत्यांना आपत्कालीन चैतन्य हाच माणसांचा आणि समाजाचा सतत टिकणारा स्थायीभाव असावा असे वाटते. ज्या देशांत लोकांना आपल्या राष्ट्राविषयी प्रेम अधिक, राष्ट्रासाठी

अंगारमळा । १७०