पान:अंगारमळा (Angarmala).pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतीमालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय नागरी जीवनाचे कुठलेच प्रश्न सुटणे शक्य नाही.

 स्वयंस्फूर्त कार्य करणाऱ्यांमध्ये ही व्यापक जाणीव मला कधीच आढळलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या वीतभर क्षितिजात बुडलेला.


 बरेचसे स्वयंस्फूर्त कार्य हे राष्ट्रावर कारगिलसारखी एखादी आपत्ती ओढवली की सुरू होते; परंतु अशा कार्यातला उत्साह व त्यातील पावित्र्य हे अल्पजीवी असते हे इतिहासाची पाने चाळली की लक्षात येते.

 १९६२ मध्ये चीनशी युद्धाचा प्रसंग आला. गाठ बलाढ्य शत्रूशी होती. सर्वच बाबतीत आपण कमी पडत होतो. तरीदेखील हिमालयाच्या रक्षणासाठी सारा देश एकत्र झाला. बायाबापड्यांनीदेखील सैन्यातील जवानांच्या मदतीसाठी अंगावरचे दागदागिने उतरवून देऊन ढीग घातले. सुदैवाने, ती सारी लढाई २१ दिवसच चालली. चीनने आपले सैन्य एकतर्फी काढून घेतले नसते, चिनी सैन्य हिमालयातून खाली उतरून गंगायमुनेच्या खोऱ्यात उतरले असते आणि साऱ्या सीमा खरोखरच इंचाइंचाने लढवण्याची वेळ आली असती तर भारतीयांचा उत्साह किती दिवस टिकून राहिला असता याबद्दल मोठी शंका आहे.

 किल्लारी भूकंप झाला. मृत्यूच्या तांडवाने थैमान घातले.साऱ्या देशातून आणि जगभरातून मदतीचे पूर लोटले. साऱ्या लोकांनी ज्या तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली आणि जिवाची बाजी लावली त्याचे सर्वत्र मोठे कौतुक होऊ लगाले; पण कौतुकाच्या शब्दांचे ध्वनिप्रतिध्वनी विरतात न विरतात तोच दगडामातीच्या ढिगाऱ्यात पडलेल्या प्रेतांच्या अंगावरचे दागिने काढून नेण्यासाठी भुरटे चोरटे हल्ले करू लागल्याच्या आणि त्यांत पोलिसही सामील झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. परदेशांतून मदतीच्या रूपाने आलेले कपडे, अन्नधान्याचे डबे मान्यवर पुढाऱ्यांच्या कुटुंबियांची आणि दोस्त मंडळींची शरीरे आणि घरे सजवू लागले. नेते मंडळींनी कोट्यवधींची माया जमा केल्याची खुलेआम चर्चा होऊ लागली.

 अलिकडे येऊन गेलेल्या सुनामीच्या लाटेने सर्वदूर विध्वंस झाला. स्वयंसेवी संघटनांचे आयतेच फावले. मुंबईत आलेल्या अलीकडच्या पुरातही हाच अनुभव. प्रत्येक मृतामागे काही ठोक रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळते म्हटल्यावर, आपत्तीच्या आधी मृत झालेल्यांचीही नावे नुकसानभरपाईच्या यादीत घातली गेली.

अंगारमळा । १६९