पान:अंगारमळा (Angarmala).pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तत्त्वनिष्ठ आणि बाकीचे सारे भ्रष्ट अशी त्यांची ठाम धारणा असते. दुर्दैवाने- समाजही अशा लोकांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत असतो.

 या सर्व समाजकार्यकर्त्यांची एक प्रतिमा, एक ढाचा तयार होतो व या क्षेत्रात नव्याने येणारी सर्व मंडळी आपापली मॉडेल्स ठरवून त्यांचे अनुकरण करीत असतात. आज दुपारीच मी सहज टी.व्ही. लावला तेव्हा टी.व्ही.वर एक हिंदी चित्रपट चालला होता. गंमत म्हणून मी तो थोडावेळ बघत होतो. त्यात एक अशीच कार्यकर्ती तरुणी दाखवली होती. तिचे नाव होते मेधा दीक्षित. मेधा पाटकर व राजीव दीक्षित या आजकाल प्रकाशझोतात असणाऱ्या दोन कार्यकर्त्यांवरून घेतलेले!

 अशा या कार्यकर्त्यांचा व्यासंग अजिबात नसतो. त्यांचे सगळे ज्ञान हे एक प्रकारचे पॅचवर्क असते- थोडे इकडून घेतलेले, थोडे तिकडून घेतलेले. मला आश्चर्य वाटते, की समाजातील जे प्रश्न सोडण्यासाठी ते झटत असतात, निदान त्यांचा वरकरणी तसा दावा तरी असतो, ते प्रश्न मुळात कसे निर्माण होतात याचा त्यांनी फारसा अभ्यास केलेलाच नसतो. तसे पाहायला गेले तर या बहुतेक सर्व समस्यांचे मूळ गरिबीत आहे व गरिबीचे मूळ आहे शेतीच्या दुर्दशेत.

 जगातील पहिला व्यवसाय शेती हा आहे. प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा, एका दाण्याचे हजार दाणे करणारा, हा एकमेव व्यवसाय. व्यापार, वाहतूक, कारखानदारी यांसारख्या अन्य कुठल्याही व्यवसायात हे घडत नाही. तिथे फक्त वस्तूंची देवाण-घेवाण होते, देवघेवीच्या मूल्याची (Exchange Value) वृद्धी होते. समाजाचा इतिहास हा या शेतीतील गुणाकाराच्या वाटपाचा-बहुतेकदा लुटीचाच- इतिहास आहे. शेतीमालाला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आपल्यापुढचे कुठलेही प्रश्न सुटणे शक्य नाही, अशी माझी धारणा आहे. उदाहरणार्थ, आपल्या शहरांतील भीषण बकालपणा, झोपडपट्टी, प्रदूषण, गलीच्छपणा हे प्रश्न घ्या. शहरांची इतकी अफाट वाढ का होते? फुटपाथवरसुद्धा पथारी पसरायला जागा नाही, अपुरा वीजपुरवठा, पाण्याचे हाल, सगळीकडे पसरलेली घाण असे सगळे वास्तव असूनसुद्धा लाखो माणसे शहरांमध्ये एकएक दिवस रेटत राहतात; एवढेच नव्हे तर दररोज त्यांत हजारोंची भर पडत असते. असे का? याचे एकमेव कारण म्हणजे शहरांतले गलीच्छ जीवन कितीही हालांचे असले तरी शेतीवरच्या उपासमारीपेक्षा ते परवडले असा शास्त्रशुद्ध विचार करूनच रोज हजारो नवे लोक ते शहरी जिणे पत्करतात. शेतीतील उत्पन्न वाढविल्याशिवाय शहरांकडे येणारा त्यांचा लोंढा थांबवताच येणार नाही

अंगारमळा । १६८