पान:अंगारमळा (Angarmala).pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकमान्यता मिळवण्याचे सोपे माध्यम होते. आजकाल स्वयंस्फूर्त क्षेत्र हे असे माध्यम बनले आहे.

 परोपकार ही एक चटकन चढणारी दारू आहे. सॉमरसेट मॉम हा माझा एक अतिशय आवडता लेखक. त्याने लिहिलेली एक छोटीशी कथा गंमतीदार आहे. एकदा येशू ख्रिस्ताला सैतान भेटतो. ख्रिस्ताने मोहाला बळी पडावे यासाठी तो अनेक लोभ दाखवतो. सानेनाणे, पैसा-अडका, जमीन-जुमला इत्यादी; पण येशू ख्रिस्त कशालाच बळी पडत नाही. शेवटी सैतान त्याला म्हणतो, की पृथ्वीवर जाऊन सर्व मानवजातीचा उद्धार करण्याची संधी मी तुला देतो. हे प्रलोभन काही ख्रिस्ताला टाळता येत नाही!

 दुसऱ्याचा उद्धार करण्यातली झिंग ही काही और असते. बऱ्याच स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांमध्ये मला एक आत्मकौतुकी Narcisist भावना आढळते, स्वत:वरच ते कमालीचे खूष असतात. वरवर जरी त्यांनी आपण हे सर्व इतरांसाठी करतो असा आव आणला, तरी प्रत्यक्षातमात्र आपल्या तेजोवलयात इतरांना सामील करून घ्यायची त्यांची अजिबात तयारी नसते. समाजहितापेक्षा आपल्या संस्थेची महती, प्रॉपर्टी व एकूण स्थान कसे उंचावेल याच्यावरतीच त्यांचे जास्त लक्ष असते. तुम्ही यांच्या विविध संस्थांची Trust deeds एकवार बघा. यातल्या बहुतेक जणांनी Trustee म्हणून आपणच तहहयात राहू याची तजवीज करून ठेवलेली असते. बाहेर यांनी लोकशाही मूल्यांचा कितीही गवगवा केला तरी स्वत:च्या संस्थामात्र ते 'हम करे सो कायदा' याच भूमिकेतून चालवीत असतात.

 या मंडळीमध्ये एक गुणमात्र असतो. ही मंडळी बोलण्यात मोठी चतुर असतात. इकडी तिकडली वाचलेली दोनचार Quotations फेकून विद्वत्तेचा आभास निर्माण करण्याची कला त्यांना चांगली अवगत झालेली असते. यांच्या संस्था म्हणजे यांचे व्यक्तिगत साम्राज्यच असते. यांच्या वागण्यातल्या विसंगतीला तर काही सीमाच नसते. वरवर गरिबांचा कळवळा दाखवणारी ही मंडळी स्वत:मात्र चैनीत जगत असतात. अन्य जीवनक्षेत्रांत त्यांना मिळू शकले असते त्यापेक्षा जास्त उत्पन्न ही मंडळी या तथाकथित स्वयंस्फूर्त क्षेत्रातून स्वत:साठी काढीत असतात. चर्चेत परकीयांना, विशेषत: अमेरिकेला, सतत दोष देणारी ही मंडळी आपल्या संस्थेला मदत मिळावी म्हणूनमात्र सतत अमेरिकेपुढे झोळी पसरत असतात. वरकरणी ज्या उच्चभ्रूना ते नावे ठेवतात त्यांच्यासारखेच जगायचा आतून ते प्रयत्न करत असतात. ही कार्यकर्ती मंडळी कमालीची मत्सरग्रस्त असतात. सर्व यशस्वी माणसांना 'लब्धप्रतिष्ठित' म्हणून हिणवायला त्यांना आवडते. आपण तेवढे

अंगारमळा । १६७