पान:अंगारमळा (Angarmala).pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येईल. असे असूनसुद्धा या क्षेत्रामध्ये अनेक लोक का शिरत असावेत? खूपदा ज्या स्वरूपाचे काम तथाकथित लाभार्थ्यांनाही नकोच असते, ज्या प्रकारच्या कार्यामध्ये स्वत:चेच व्यक्तिमत्त्व खुरटले जाते, त्या प्रकारच्या कार्यात ही मंडळी स्वत: का सामील होतात? खूपदा स्वयंस्फूर्त कार्य हा एक कधीही न संपणारा बोगदा असतो. अशा बोगद्यात ही मंडळी का उतरतात? आपण हे सगळे करतो आहोत हे कशासाठी, यातून काय निष्पन्न होणार आहे, हा विचारसुद्धा त्यांच्या डोक्यात का येत नाही? मुळात समाजसेवेचा हा विंचू त्यांना डसतोच का?

 गेल्या वीस वर्षांत मी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने सतत प्रवास करीत आहे. ठिकठिकाणी लोकांना भेटत आहे, चर्चा करत आहे. या सर्व प्रवासात स्वयंस्फूर्त क्षेत्रांतील असंख्य लहान-थोर नेत्यांना मी खूप जवळून पाहिले आहे. एखाद-दुसरा अपवाद वगळता, त्यांतल्या बहुतेकांविषयी माझ्या मनात कौतुकाची भावना उरलेली नाही.

 यांतली बहुतेक मंडळी ही आपल्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जीवनात फारशी यशस्वी ठरलेली नाहीत, तरीही त्यांना असे वाटत असते, की आपण कोणीतरी खूप महान आहोत, आपली लायकी समाजाला पुरती कळलेली नाही. कसेही करून त्यांना प्रकाशात यायचे असते. (अशा प्रकारच्या सर्व विधानांना अपवाद नि:संशय असतात व यासंदर्भातही असे अपवाद निश्चितच आहेत, परंतु असे अपवाद वगळता, सर्वसाधारणत: माझी निरीक्षणे बरोबर आहेत असे मला वाटते.) अशा प्रकारचे स्वयंस्फूर्त कार्य करीत राहणे ही अशा मुळात सर्वसाधारण (Mediocre) असलेल्या काही मंडळींची गरजच असते. यामागे काही जैविक कारणेही आहेत. अशा कार्याद्वारे इतरांचे लक्ष स्वत:कडे वेधून घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. दुबळे मूल किरकीर करून इतरांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेत असते, तर गुटगुटीत मूल स्वभावत:च शांत, आत्ममग्न असते, ते स्वत:शीच खेळत असते, इतरांचे लक्ष वेधून घ्यायची त्याला फारशी गरज वाटत नाही.

 अशा स्वयंसेवी कार्यकर्त्यांची नम्रता ही वरकरणी असते. आतून ही मंडळी अतिशय अहंकारी व महत्त्वाकांक्षी असतात. आपले कार्यक्षेत्र निवडतानासुद्धा स्वत:ला जास्तीत जास्त प्रसिद्धी व लोकमान्यता मिळेल असेच क्षेत्र ते निवडतात. आपल्या लौकिक जीवनात ही मंडळी फारशी यशस्वी नसतात. नोकरीधंद्यात अयशस्वी ठरलेली असतात. खूपदा आपल्या कौटुंबिक जीवनातही ती दु:खी असतात. नियतीची यांना कुठे ना कुठे जोरदार ठोकर बसलेली असते आणि सामान्यत: अशीच मंडळी आपल्याला समाजकार्याकडे वळताना आढळतील. एकेकाळी कविता करणे वा कथा लिहिणे हे

अंगारमळा । १६६