पान:अंगारमळा (Angarmala).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असा शब्द वापरून गावातील सर्वसामान्यांची भावना व्यक्त केली आहे. इंग्रजांची राजवट आल्यानंतरही, "सामाजिक प्रगतीला नि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रज राज्य परवडले. नानासाहेब पेशवे यशस्वी झाले असते तर ब्रह्मणांचे जातिश्रेष्ठत्व मानणारे, अन्यायी नि प्रतिगामी ब्राह्मणी राज्य पुन्हा महाराष्ट्रात आले असते अशी त्यांना भीती वाटत होती."

 जोतिबांची भावना हीच देवगिरीच्या आसपासच्या कुणब्याशूद्रांची भावना असली पाहिजे. हीच भावना सर्वसाधारण प्रजेची त्यांच्या जवळच्या गढीत किंवा किल्ल्यावर राहणाऱ्या तथाकथित देशबांधव स्वधर्मीय सरदार-राजांबद्दल असली पाहिजे. रामदेवराय आणि अल्लाउद्दीन यांत फरक एवढाच की पहिला दरवर्षी उभी पिके हक्काने कापून नेई, तर दुसरा कधी तरी एकदा येणार. रामदेवरायाच्या पराभवात प्रजेला थोडे तरी सूडाचे समाधान मिळत असले पाहिजे. रामदेवरायाकडून लुटले जायचे का अल्लाउद्दिनाकडून असा आणि एवढाच पर्याय रयतेपुढे असेल तर परकीय लुटारूच्या रूपाने मोचकच आला अशी प्रजेची भावना का होऊ नये? शिवाय, दोन लुटारूंच्या लढाईत स्वत: मरण्यात त्याला का स्वारस्य वाटावे? बंदा बहादुराच्या व त्यानंतरच्या पंजाबमधील लढायांसंबंधी खुशवंतसिंग म्हणतात, "शिखांकडून किंवा मराठ्यांकडून लुटून घ्यायचे का अब्दालीकडून एवढाच पर्याय पंजाबी शेतकऱ्यांसमोर असे आणि त्यातल्या त्यात मुसलमानांकडून लुटले जाणे हा सौम्य पर्याय वाटे."

 राष्ट्रवादी इतिहासकारांनी मध्ययुगातही राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात होती असे गृहीत धरले आहे; पण असे राष्ट्र त्यावेळी अस्तित्वात नव्हते. जोतिबांच्या वेळीही नव्हते. "अठरा धान्यांची एकी होऊन त्याचे चरचरीत कडबोळे म्हणजे एकमय लोक (Nation) कसे होऊ शकेल?" (सार्वजनिक सत्यधर्म - 'महात्मा फुले : समग्र वाङ्मय', संपादक धनंजय कीर व स.गं. मालशे, सुधारित तृतीयावृत्ती १९८८, पृ. ४२३)

 आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये दरवर्षी एका दाण्याचे हजार दाणे होण्याचा जो गुणाकार होतो, तो लुटण्याची आहे. लुटण्याची वेगवेगळी साधने वापरली गेली. दरोडेखोरी, सैन्याची लूट, राजांचा महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, सावकारी, जमीनदारी. सर्व समाजाचा इतिहास हा शेतीला लुटण्याच्या साधनांच्या विकासाचा इतिहास असतो.

 अशा प्रकारे आपण भिन्न क्षेत्रांतील स्वयंस्फूर्त कार्याचा एकूण आढावा घेतला तर त्या सर्वच क्षेत्रांमध्ये स्वयंस्फूर्त कार्याचा प्रयोग फसलेला आहे हे आपल्या लक्षात

अंगारमळा । १६५