पान:अंगारमळा (Angarmala).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लढला. मग रामदेवरायाच्या वेळी का नाही तो उभा राहिला? बरे, शत्रूच्या फौजा किल्ल्यापाशी येऊन पोहोचल्यानंतर तरी वेढ्याच्या बाहेरच्या लोकांनी वेढ्याची कुतरओढ का नाही केली?

 इतिहासात जागोजागी वाचावे लागते की रजपूत, मराठा सैन्य शिकस्तीने लढले, पण अखेरीस शत्रूच्या प्रचंड संख्याबळापुढे त्यांचे काही चालले नाही. मोगल हजारो मैलांवरून येथे आलेले. त्यांची संख्येची ताकद स्थानिक राजांच्या त्यांच्या स्वत:च्या प्रदेशातील ताकदीपेक्षा जास्त कशी राहिली?

 हे कोडे अनेकांनी मांडले आहे. अगदी १८५३ मध्ये मार्क्सने एंगल्सला लिहिलेल्या पत्रात मांडले आहे. भारतातील गावगाड्याबद्दल तो लिहितो,

 "खेड्यात राहणाऱ्यांना राज्ये फुटली-मोडली याचे काहीच सुखदु:ख नाही. खेड्याला धक्का लागला नाही, तर ते कोणत्या राजाकडे जाते, कोणत्या सुलतानाची त्यावर अधिसत्ता चालते याची त्यांना काहीच चिंता नसते, गावगाडा अबाधित चालत राहतो."

 'राधामाधवविलासचंपू'च्या प्रस्तावनेत हे कोडे वेगळ्या पद्धतीने राजवाड्यांनी मांडले आहे. हिंदू राजवटीतील महाराष्ट्राच्या संस्कृतीची व्याप्ती अत्यल्प ब्राह्मणांपुरती व उत्तरेकडील क्षत्रियांपुरती होती. बहुसंख्य नागवंशादी मराठे अत्यंत मागासलेले असून, त्यांत राष्ट्रभावनेचा उदय झालेला नसल्यामुळे ते अभिमानाने लढण्यास पुढे येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे अल्पसंख्य आर्यक्षत्रियांचा पराभव होताच महाराष्ट्रात मुसलमानी राजवट आली. सेनापती पडताच सैरावैरा पळत सुटण्याच्या प्रवृत्तीची पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या संदर्भात राजवाड्यांनी मीमांसा केली आहे. त्यात 'अधम', 'पशुतुल्य', 'द्विपाद' इत्यादी विशेषणे वापरून राजवाडे म्हणतात, एक अन्नदाता गेला म्हणजे दुसऱ्याच्या शोधात हे पोटभरू ताबडतोब सुटत. 'महिकावतीची बखर' पुस्तकाच्या प्रस्तावनेत हा विचार त्यांनी अधिक स्पष्ट केला आहे.

 "गेल्या तीन हजार वर्षांत हिंदुस्थानात जी देशी व परदेशी सरकारे होऊन गेली, ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे एक उपटसुंभ चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंत:स्थ प्रामाणिक समजूत आहे."

 राष्ट्रवादी इतिहासकारांनी उदोउदो केलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील बंडखोरांची सर्वसामान्य जनतेला किती धास्ती वाटत होती, याचे वर्णन इतिहासकाराचा अभिनिवेश नसलेल्या गोडसे भटजींनी आपल्या प्रवासवर्णनात सविस्तर केले आहे.

 शूद्रातिशुद्रांचा राणा जोतिबा फुले यांनी मुसलमानी आक्रमणाला सरळ 'विमोचन'

अंगारमळा । १६४