पान:अंगारमळा (Angarmala).pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

न सामावणारी कल्पनाही तयार करावी लागली. कोणत्याही व्यवस्थेच्या उत्पत्ति-स्थिती-लयाची मीमांसा करणाऱ्या मार्क्सलाच वर्गविहीन परिपूर्ण समाजाच्या स्वप्नांची भाकडकथा तयार करावी लागली. ती प्रत्यक्षात येण्याचा काहीच संभव नव्हता. इतिहासाला मार्क्सवर इतकी मेहेरनजर करण्याची काहीच आवश्यकता नव्हती.

 भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे महात्माजी सरसेनापती होते. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या, नि:शस्त्र, असंघटित जनांना बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उभे करण्याचे प्रचंड काम त्यांनी घेतले. चंपारण्याच्या, बारडोलीच्या अनुभवांनंतर अस्पृश्य शेतमजुरांना, खेडुतांना चळवळीत गोवून घेतले पाहिजे हे ओळखणारा, चौरीचुरापासून 'करेंगे या मरेंगे' पर्यंत झेप घेणारा हा रणधुरंधर आंदोलनासाठी नवनव्या आघाड्या व फौजा तयार करण्याकरिता पारंपरिक नीतिकल्पना वापरत होता. त्यांतून पारंपरिक नैतिकतेवर आधारित असा समाज निर्माण होईल अशी महात्माजींची अपेक्षा असली तर शासनाचे नेतृत्व त्यांनी आधुनिकीकरणवादी पंडितजींकडे सोपवले असते किंवा नाही, याबद्दल जबरदस्त शंका घेण्यास जागा आहे.

 विचारवंतांनी केलेल्या स्वप्नरंजनाची परिपूर्ती न झाल्यामुळे आरामखुर्चीत बसलेल्या विद्वानांना कितीही वेदना झाल्या तरीही काळपुरुषाला त्याची काही पर्वा वाटताना दिसत नाही.

 "आपला तो बबड्या आणि लोकांचं ते कारटं" या वृत्तीने महाराष्ट्राच्या इतिहासात काही आत्मकौतुकाचा भाग यावा हे समजण्यासारखे आहे. पुण्यातील पेशव्यांचा विश्रामबागवाडा पाहिला आणि त्याच्या दीडदोनशे वर्षे आधी दिल्लीश्वरांनी केलेली बांधकामे पाहिली म्हणजे सर्व देशाच्या इतिहासात पेशव्यांचे स्थान काय होते याबद्दलची वर्णने अवास्तव असावीत हे स्पष्टच होते. छत्रसाल, सूरजमल, जाट, हैदर, टिपू यांसारख्या इतर प्रदेशांतील पुरुषांच्या कार्यासंदर्भात मराठ्यांचा इतिहास लिहिला पाहिजे याची जाणीव होते. महाराष्ट्राचा इतिहास आत्मकौतुकाने भरलेला आहे आणि अवाजवीपणे आत्मकेंद्रीही आहे.

 पण याहीपेक्षा एक फार मोठे कोडे इतिहास वाचताना मला पडते. देवगिरीचे एवढे बलाढ्य राज्य; पण मुसलमानी फौजा अगदी बिनधास्त गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोचल्या कशा? महाराष्ट्राच्या मध्यकेंद्रापर्यंत पोचण्याच्या आधी या परकी सैन्याला वाटेवरच्या शेतकऱ्यांनी, जनसामान्यांनी काहीच विरोध केला नाही? त्यांना नेतृत्व नसले मिळाले तरी काय झाले? राजारामाच्या वेळी कोठे होते नेतृत्व? तरी उभा महाराष्ट्र जागोजाग

अंगारमळा । १६३