पान:अंगारमळा (Angarmala).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटले याचे आश्चर्य वाटते. समाज एका दोषास्पद अवस्थेतून दुसऱ्या दोषास्पद अवस्थेकडे जातो. जुने दोष समाजविकासाच्या आड येतात तेव्हा त्यांना दूर केले जाते. प्रयत्नांना वाचा हवी असते. ती वाचा पुरवण्याचे काम तत्कालीन पैगंबराकडे जाते.

 मग प्रश्न निर्माण होतो तो हा, की परिवर्तनात थोर व्यक्तींनी नेमकी काय भूमिका बजावली? पैगंबराच्या विचारांच्या आधारे समाजपरिवर्तन घडून येते ही कल्पना पूर्णपणे भ्रामक आहे. रुसो, वॉल्टेअर यांच्या विचारांनी फ्रेंच राज्यक्रांती घडली नाही, मार्क्समुळे रशियन क्रांती घडली नाही, गांधीवादामुळे भारतातील स्वातंत्र्यचळवळ उभी राहिली नाही. समाज स्वत:च परिवर्तनाची दिशा ठरवत असतो, मार्गक्रमण करीत असतो. मार्गक्रमांचे समर्थन करणारा सोयीस्कर विचार आसपासच्या विचार-मंडीत शोधला जातो, आवश्यक तर उत्खनन करून काढला जातो. वाळवंटातील भटक्या टोळ्यांना इस्लाम-प्रसाराचे तत्त्वज्ञान सोयीस्कर होते. सर्व युरोप खंडात एकेकाळी प्रभुत्व असलेल्या; पण औद्योगिक विकासात मागे पडलेल्या रशियाला समाजवादी औद्योगिकीरणाचा विचार रुजणारा होता. इंग्रजांना हटवून त्यांची जागा पटकावू पाहणाऱ्या हिंदुस्थानातील नव्या व्यापारी, कारखानदारवर्गाला गांधी तत्त्वज्ञान सोयीस्कर होते. त्या त्या वेळच्या आर्थिक गरजांनी स्वत:साठी तत्त्वज्ञान निवडले. तत्त्वज्ञान्यांनी आर्थिक व्यवस्थेला गती दिली नाही.

 रशियात मार्क्सवादाचा पराभव झाला, हे म्हणजे चूक आहे. गांधीवादही भारतात हरला नाही. मुळात या विचारांचा प्रयोग रशियात, भारतात झाला हे म्हणणे चूक आहे. या देशांत जे घडले त्याला मार्क्सवाद वा गांधीवाद अशी एक सोयीस्कर पाटी लावण्यात आली आहे. 'सुभाष केशकर्तनालया'चा सुभाषचंद्र बोसांशी जितका संबंध तितकाच या देशांतील घटनांचा मार्क्सशी व गांधींशी संबंध.

 मार्क्सला सापडलेले सत्यकण हे स्थलकालसापेक्ष होते. अतिरिक्त मूल्याचा प्रमुख स्रोत कामगारांच्या शोषणात नाही, तिसऱ्या जगाच्या शोषणात आहे हे मार्क्सला समजले नव्हते असे नाही. साम्राज्यवादाच्या आर्थिक परिणामांचे तपशीलवार वर्णन त्याने दिले आहे. रोझा लुक्झेंबुर्गला तिसऱ्या जगातील लुटीचे भांडवलनिर्मितीच्या प्रक्रियेतील मान्य उमगले होते. मार्क्सला ते स्वच्छ दिसत असले पाहिजे; पण १९४८ च्या उठावाच्या अनुभवाने केवळ कामगारच क्रांती करू शकेल ही कल्पना मनात दृढ झालेली. त्या कामगारवर्गाला क्रांतीसाठी उद्युक्त करावयाचे तर त्यांच्याच शोषणातून अर्थशास्त्र उभारावयास पाहिजे. वर्गजाणिवेसारखी, तादात्म्यासारखी मार्क्सच्या जडवादात अजिबात

अंगारमळा । १६२