पान:अंगारमळा (Angarmala).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे दिसते. शोषितांचे नाव घेऊन ते ही आघाडी उघडतात. उदाहरणार्थ, परदेशी भांडवलदाराविरुद्ध आघाडी स्थानिक भांडवलदार उघडतात-वरकरणी नाव मात्र गांधींच्या तत्त्वज्ञानाचे किंवा स्वदेशीचे किंवा शिवशाहीचे असते.

 जनन्मान्य थोर विचारवंत, लोकधुरीणांच्या दर्शनाची ही शोकांतिका विचार करावयास लावणारी आहे.

 पहिला प्रश्न निर्माण होतो तो हा, की या प्रेषितांनी आदर्श समाजाची पाहिलेली स्वप्ने योग्य होती का? तत्कालीन समाजातील समस्यांचे अचूक विश्लेषण त्यानी केले. ते दोष दूर केल्यानंतर ज्याआदर्श समाजाची निर्मिती होईल त्याचे मोठे मनोहारी चित्रण हर 'पैगंबराने' उभे केले. ॲरिस्टॉटल, प्लेटोपासून मार्क्स -गांधींपर्यंत प्रत्येकाने एक आदर्श समाजाचे लोभस चित्र लोकांसमोर ठेवले.

 अतिरिक्त मूल्यांचे विश्लेषण मार्क्सने केले.तेवढ्या आधारावर कामगारक्रांतीची आणि वर्गहीन समाजाची स्वप्ने रंगवणे हे मार्क्ससारख्या प्रकांड बुद्धिवाद्याला कसे काय योग्य वाटले? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या आदर्शावर समग्र समाज उभा राहिल्याची कल्पना गांधींनी करणे कितपत वास्तववादी होते?

 प्रत्येक छायाचित्राचा एक केंद्रबिंदू असतो. त्या बिंदूत प्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट दिसते. त्या बिंदूपासून जितके दूर जावे तितकी प्रतिमेची गुणवत्ता कमी होत जाते. प्रत्येक छोट्या-मोठ्या विचारवंतांच्या विचारपद्धतीचेही असेच असते. काही केंद्रबिंदूत त्यांना त्यांच्या काळाला व परिस्थितीला अनुरूप असा साक्षत्कार होतो. बुद्धिनिष्ठ सचोटी राखून आपला विचार तेवढ्यापुरताच मर्यादित ठेवावा हे आजपर्यंत थोराथोरांना जमलेले नाही. आपल्याला गवसलेल्या सत्यकणांच्या आधारे विश्वव्यापी पसाऱ्याला गवसणी घालण्यच्या मोहाला मोठमोठे बळी पडले आहेत. विश्वाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वत:च्या पराभवाचा पाया घातला.

 आपल्या विचाराचा भविष्यावर परिणाम काय होईल, याचे चित्रण करताना बुद्धिनिष्ठ कठोर तर्कशास्त्राला सोडून देण्याचा मोह त्यांना का पडला? अनुयायांना एक विशाल दर्शन देऊन, सर्वसंग परित्यागाला तयार करण्यासाठी? स्वप्ने विकण्याच्या धंद्यात ते का पडले हे सांगणे कठीण आहे.

 मुळात आदर्श, सुखी, शांतिपूर्ण समाज ही कल्पनाच हास्यास्पद आहे. मनुष्यप्राणी संपूर्ण सुखी होऊच शकत नाही. कधी काळी तो असा सुखी झाला तर त्या कारणानेच तो दु:खी होईल. विरोधविकासवादाच्या जनकालासुझ परिपूर्ण समाजाचे स्वप्न रंगवावेसे

अंगारमळा । १६१