पान:अंगारमळा (Angarmala).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्गरहित, शोषणरहित, समाजवादी समाजाची निर्मिती व त्यांतून मानवी मनाची मुक्ती एवढ्या सगळ्या, सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या पायावर मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादाची उभारणी झाली. जगातील सर्व कामगारांना एक करण्याचे स्वप्न पाहत कामगार चळवळ जगभर उभी राहिली. आपल्या देशात अनेकांनी या चळवळीत स्वत:ला झोकून दिले, बलिदान केले. मजुरीच्या रूपात, बोनसच्या रूपात, नोकरीच्या अटी, शर्तीबाबत सुधारणा असे अनेक फायदे मजुरांनी पदरात पाडूनही घेतले, पण मार्क्सवादी दर्शनाची बांधिलकी काही तयार झाली नाही.

 कामगारनेतेपण हा व्यवसाय होऊ लागला. जो पाच-दहा रुपये जास्त मिळवून देईल, त्याच्यामागे कामगार जाऊ लागले, कामगारक्रांतीच्या मार्गाने मानवजातीच्या मुक्तीचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून. ही हकिकत आहे. ज्या देशात तथाकथित मार्क्सवादी राजवट आली तेथे घडून आलेले बदलही किरकोळ, भांडवलशाही व्यवस्थेचा हा नवा अवतार असे वाटावे अशा धर्तीचे. हे असे का झाले? मार्क्सने नैतिक प्रश्नावर मौन पाळले होते. कामगारांचे शोषण थांबवा, उपयोगमूल्य व विनिमयमूल्य यांतील तफावत रद्द करा अशी निव्वळ मागणीबहाद्दर भूमिका त्याने घेतली नव्हती. तरी त्याच्या आंदोलनाची नैतिक परिणती त्याला पाहिजे तशी झाली नाही. अर्थव्यवस्थेच्या बदलांतून अपेक्षित परिवर्तन घडून आले नाही.

 नैतिकतेवर अर्थव्यवस्था आधारू पाहणाऱ्या महात्मा गाधींची शोकांतिका मार्क्सहूनही भयानक आहे. जगाच्या इतिहासात म. गांधींइतका कोणत्याही युगपुरुषाशी त्याच्याच शिष्यांनी द्रोह केला नसेल. गांधीवादाला अपेक्षित आर्थिक व्यवस्थेच्या नेमकी उलटी व्यवस्था त्यांच्या परमशिष्यांनी उभारू घातली. गांधीवादी नैतिकता त्यांच्या शिष्योत्तमांनीची उलथवली. महात्मा गांधींनी त्यांच्या विचारात नैतिक बाजू कोठेही लंगडी ठेवली नव्हती; पण प्रत्यक्षात तिचा समाजजीवनावर काहीच परिणाम झाला नव्हता.

 मार्क्सवाद्यांच्या क्रांतितत्त्वज्ञानात एक मोठी चूक वारंवार आढळते. शोषित शोषकांविरूद्ध लढा उभारतात, कमालीचे शोषण झाले की शोषित उफाळून क्रांती करतात, प्रस्थापित व्यवस्था उधळून देण्यास कंबर बांधतात असा काहीतरी विचार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो.

 अगदी शरीरशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा ही कल्पना अवास्तव आहे. अतिशोषितांमध्ये उठण्याची ताकदच नसते. शोषणाच्या अगदी सुरवातीच्या पायरीत त्यांची प्रतिकारक्षमता खलास होते. प्रत्यक्षात शोषक क्रमांक एकविरुद्ध शोषक क्रमांक दोन आघाडी उघडतात

अंगारमळा । १६०