पान:अंगारमळा (Angarmala).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रश्न सुटला आहे, उद्याचा विचार करण्यची फुरसत आहे तेव्हा मनुष्य थोडा दूरचा विचार करून, दूरच्या फायद्यासाठी आजच्या स्वार्थाला मुरड घालू शकतो. सर्व व्यवस्थित असले तर अगदी जन्मांतराचीसुद्धा चिंता वाहता येते. आर्थिक स्थैर्याची भावना व परार्थाची नीतिमत्ता यांच्यात संख्याशास्त्रीय संबंध आहे.

 आर्थिक विपन्नतेतही परार्थाची आवड आणि संपन्नतेतही दुष्टता या अनेक व्यक्तींत सापडतातही; पण संख्याशास्त्रीय संबंध त्यामुळे नाकारता येणार नाही. परार्थ हा व्यापक स्वार्थच असतो.

 परार्थाचा हा अर्थ समजून घेऊन अवघ्या मानवजातीला एका मानसिक गुलामगिरीतून सोडवणे आवश्यक आहे. खावे, प्यावे, उपभोगावे या नैसर्गिक प्रेरणा. त्यांचे यथायोग्य पोषण झाले तर सहभोगाचीही गोडी वाटू लागते, गावाबरोबर जगण्यात आनंद वाटू शकतो, राष्ट्राकरिता प्राण देण्याची ऊर्मीही तयार होऊ शकते. त्यातही एका अलोट आनंदाचा अनुभव घेता येऊ लागतो.

 प्रचंड दु:ख आणि यातना सोसून केवळ दुसऱ्याच्या भल्याकरिता मी हे दिव्य करीत आहे असे कोणी म्हटले, की माझ्या मनात भीतीच्या घंटा वाजू लागतात. असे म्हणणारा निरोगी मनाचा नाही, याने काही लपवलेले आहे, या बोकेसंन्याशाच्या मनात काही क्षुद्र स्वार्थ आहे, असे मला वाटू लागते. मी हे माझ्या आनंदाकरिता करतो आहे, स्वार्थाकरिता करतो आहे, हे सांगण्यात कोणालाही शरम का वाटावी? परार्थाची साखर पेरणारा क्षुद्र स्वार्थ साधतो. त्यापेक्षा स्वार्थी बना, जितक्या व्यापक अर्थांनी, जितक्या मार्गांनी आयुष्य परिपूर्ण करता येईल तितके करा. दुसऱ्याचे हक्क लाथाडू नका. परार्थ म्हणून नव्हे, निव्वळ स्वत:च्या आयुष्याची परिपूर्णता कमी होऊ नये म्हणून-अशी शिकवण ठीक. हीच खरीखुरी नैतिकता होईल.

 मी भविष्यातील आदर्श समाजाचे काहीच स्वप्न देत नाही; स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणे हा मार्ग सांगतो; पण या कक्षा रुंदावत पोचायचे कोठे हे मात्र सांगत नाही. नैतिकता ही कोणत्याही एका विवक्षित व्यवस्थेत नाही, ती मार्गक्रमणात आहे असे मानल्यानंतर आदर्शभूत समाज ही कल्पनाच अर्थहीन होते. आदर्शाची चित्रणे करणाऱ्या विचारपद्धतीपैकी मार्क्स व गांधी यांच्या स्वप्नसृष्टीचे काय झाले हे पाहण्यासारखे आहे.

 मार्क्सवादाच्या समग्र विचारपद्धतीवर विसाव्या शतकातील कामगार चळवळ उभी राहिलेली आहे. जडवाद, विरोध विकासवाद, विपरीत उत्पादनसंबंध, खासगी मालमत्ता, अतिरिक्त मूल्य, मजुरांचे शोषण, वर्गसंघर्ष यांतून भांडवलशाहीचा अटळ विनाश, यांतून

अंगारमळा । १५९