पान:अंगारमळा (Angarmala).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करून दुसऱ्याचे भले करण्यात काही एक मोठेपण आहे असे बहुतेक काळात मानले गेले आहे. दुसऱ्यासाठी जगलास तर अमर झालास, स्वत:करिता जगलास तर मेलास, अशा अर्थाची अनेक बोधवचने सतत वापरली जात असतात.

 'संसार करावा नेटका' किंवा 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे' यांसारखी अपवादात्मक वचने सोडल्यास संतवाणी ही वैराग्याची, नि:संगत्वाची आणि गरिबीचे गुणगान करण्याकरिताच राबली आहे.

 जे दुर्मिळ त्याची किंमत जास्त या मागणी-पुरवठ्याच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार परहितरत वर्तणुकीला अलोट महत्त्व मिळाले असावे. परार्थाच्या महत्त्वाचे दुसरेही एक कारण असू शकेल. व्यावहारिक जगातील प्रत्यक्ष जगणे आणि व्यक्तीची जाहीर केली गेलेली तथाकथित तत्त्वे यांमध्ये प्रचंड दरी असते. उदाहरणार्थ, विश्वाची स्वयंभू उत्क्रांती मानणारे मार्क्सवादी अर्थव्यवस्थेलामात्र नियोजनाची आवश्यकता प्रतिपादतात, तर विश्वकर्त्यावर श्रद्धा सांगणारे अर्थव्यवस्थेच्या खुल्या विकासांची महती सांगतात. व्यवहारात स्वार्थाने वागल्यानंतर शब्दांत तरी परार्थाचे गुणगान गायिले तर मन:शांती सुलभ होते म्हणूनही परार्थाचे हे कौतुक असावे. बलाढ्यांनी ताकदीच्या बळावर प्रभुत्व गाजवायच्या दिवसांत दीनदुबळ्यांच्या साहाय्याला क्वचित यातील काही संतवचने आली असतीलही; पण सत्तेच्या भर सद्दीत कोणा सुलतानाला संतांच्या शिकवणीमुळे बंधने पडल्याचे मात्र इतिहास कचितच सांगतो.

 एकेकाळी मुंबईतील माणसे बसच्या रांगेची शिस्त कटाक्षाने पाळत. एका बसमध्ये जागा मिळाली नाही तर शांतपणे दुसरी येण्याची वाट पाहत थांबत. त्या काळी दिल्लीकर बस पकडताना पराकोटीची बेशिस्त आणि हुल्लड दाखवत असत. याचा अर्थ दिल्लीवाले कमी नीतिमान आहेत असा नाही. मुंबईच्या व्यवस्थेत एक बस गेली तरी दुसरी; नाही तरी त्यापुढची मिळण्याची जवळ जवळ खात्री वाटत असे. दिल्लीत तर तशी आशाही नसे. यामुळे दोघांच्या वर्तणुकीत फरक पडत असे.

 भविष्यात जितके दूर पाहण्याची शक्यता, तितका मनुष्य नागड्या स्वार्थापासून दूर जातो. डोंगराच्या शिखरावरून पाहिले, विश्वाच्या व्यापकतेच्या तुलनेने स्वत:ची, स्वत:च्या इच्छा-आकांक्षांची क्षुद्रता जाणवली की काही काळ विचार बदलतात, तसाच हा प्रकार आहे.

 आजची भ्रांत आहे, उद्याची आशा नाही, कोण काय म्हणेल याची चिंता करण्याचे कारण नाही अशा अवस्थेत नागड्या तात्कालिक स्वार्थाची उपज सहज होते. आजचा

अंगारमळा । १५८