पान:अंगारमळा (Angarmala).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सोय करणे, त्यांना स्वावलंबी बनविणे अशा तऱ्हेची कामे करता येतात; पण गुजराथेतील ईला भट यांच्या सेवासंस्थेसारखे काही अपवाद सोडले तर इतरांना त्यांत फारसे यश मिळत नाही. अशा कामांना प्रचंड मेहनत, चिकाटी, व्यवस्थापन-कौशल्य आणि व्यवसायबुद्धी यांची गरज असते.

 स्त्रियांचा प्रश्न हा अनेक संस्थांत, विश्वविद्यालयांत अभ्यासाचा स्वतंत्र विषय म्हणून मान्यताप्राप्त झाला आहे. त्यामुळे स्त्रियांच्या परिषदा भरवणे, परिसंवाद घडवून आणणे हे काम गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रचंड जोमाने चालू आहे. महिला कार्यकर्त्या राज्यपातळीवरील परिसंवादांत आधी मान्यता पावतात, मग हळूहळू राष्ट्रीय पातळीवर त्या परिसंवाद करू लागतात आणि शेवटची पायरी म्हणजे, वर्षातून दोनचार वेळा वेगवेगळ्या देशांत घडणाऱ्या परिसंवादांतील जागाही भूषवू लागतात. महिला-चळवळीतील कार्यकर्त्यांचे या दृष्टीने तीन संच बनतात; आगगाडीसंच, विमानसंच आणि जेटसंच! यातून स्त्रीप्रश्नाविषयीची खरी कळकळ ओसरू लागली, ती एक 'करिअर' बनली.

 वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापली कर्तबगारी दाखविणाऱ्या स्त्रिया होत्या. कोणी वकील होत्या, कोणी डॉक्टर; कोणी लष्करात जात होत्या तर कोणी वैमानिक बनत होत्या; कोणी साहसाची कामे करीत होत्या, तर कोणी कलाक्षेत्रात चमकत होत्या. अनेक उद्योजक महिलांनी कारखानदारी, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतही आपल्या स्त्रीपणाचा कोणाताही आधार न घेता मोठी कामगिरी करून दाखवली. साऱ्या स्त्रीजातीस ललामभूत असलेल्या या दुर्गा स्त्री-चळवळीपासून दूर झाल्या आणि स्त्री-चळवळ वावदूक मुखंडींच्या हाती गेली.

 खरे बघायला गेले तर स्त्रियांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न स्त्री-मुक्तीच्या चळवळीमुळे नव्हे तर इतर अनेक कारणांमुळे सुटलेले आहेत. उदाहरणार्थ, स्त्री-शिक्षणाला महर्षी कर्वे यांच्या कार्यामुळे जेवढी प्रेरणा मिळाली त्याहून जास्त प्रेरणा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आलेल्या रेशनिंगमुळे मिळाली. रेशनिंग खात्यात शिकलेल्या बायकांना नोकऱ्या मिळू लागल्या, या नोकऱ्यांमुळे आर्थिक उत्पन्नाचे साधन बायांना प्रथमच उपलब्ध झाले आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर बायकांनी शिकायला सुरवात केली.

 स्त्रियांचे जीवन सुखकर करण्यामध्ये सगळ्या चळवळीपेक्षा कितीतरी जास्त वाटा हा आधुनिक तंत्रज्ञानाने उचलला आहे. शिवण्याच्या यंत्रामुळे किंवा मिक्सरमुळे किंवा वॉशिंग मशीनमुळे सर्वसामान्य स्त्रीचे जीवन जितके सुकर झाले, तितके कुठल्याही

अंगारमळा । १५५