पान:अंगारमळा (Angarmala).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वातंत्र्याच्या एखाद्या तरी प्रकाशकिरणाकरिता मनात आक्रंदणाऱ्या मुसलमान मायबहिणीसुद्धा 'शरियत'चे समर्थन करू लागतात. मुस्लिम समाजाचे अर्थकारण करणारा नेता जन्मलाच नाही, हे मोठे दुर्दैव आहे.

 दलितांची परिस्थितीही काही फार वेगळी नाही. हिंदू समाजापासूनची त्यांची फारकत काही बाबतीत थोडी कमी, तर काही बाबतीत पुष्कळ जास्त. गावच्या वतनदार महाराला चावडीसमोर कमरेत वाकून जावे लागे; पण तोच मुसलमान बनला तर जोडे घालून थेट चावडीपर्यंत जाऊ शके. मीनाक्षीपुरमचा हाच धडा आहे. इस्लामने त्याच्या आश्रयाला आलेल्यांना काही प्रमाणात सन्मान दिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे बुद्धाला शरण गेलेल्यांना तशा सन्मानाचे भाग्यही मिळाले नाही. दलितांत फारसे कुणी मोठे व्यापारी, कारखानदारही नाही. समाजाचे नेतृत्व राजकीय सत्तेच्या काही दलालांकडे आणि राखीव जागेच्या धोरणाचा फायदा मिळालेल्या काही भाग्यवानांकडे. मुस्लिम नेतृत्वाप्रमाणेच दलित नेतृत्वालासुद्धा चिंता आहे ती दलितत्व संपवण्याची नाही, तर आपले नेतृत्व टिकवण्याची.

 आजपर्यंत शेतकरी संघटनेमध्ये मला जो अनुभव आला, त्यावरून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, की या देशातील सामान्य माणसाच्या मनामध्ये कुठेही जातीयवाद नाही, भाषावाद नाही, धर्मवाद नाही. हे सर्व क्षुद्रवाद स्वार्थी राजकारण्यांनी केवळ जोपासून ठेवले आहेत. सर तर यापैकी एकही भांडण झाले नसते. आपल्या देशातले एखादे राज्य म्हणते, की आम्हाला फुटून जायचे आहे. अमेरिकेतले एखादे संस्थान असे म्हणते का? मुळीच नाही. तिथेसुद्धा अनेक धर्मांची, पंथांची माणसे आहेत; अनेक राज्यांची आहेत; पण तिथे असे कुणी म्हणत नाही. उलट, अमेरिकेतील संस्थान असणे ही प्रतिष्ठेची, सन्मानाची गोष्ट समजली जाते. अशी भावना आपल्याकडे निर्माणच होऊ शकली नाही, कारण आम्ही गरिबी हटवू शकलो नाही.

 मी हिंदू घरात जन्मलो, ब्राह्मण घरात जन्मलो. आयुष्यातील पहिली १८-२० वर्षे सगळे धर्माचार केले, स्नानसंध्यादी विधी केले, पाठांतरही केले. आज मी यांतले काहीही करत नाही. विश्वाच्या उत्पत्तीसाठी, जीवमात्राच्या उत्क्रांतीसाठी आणि मनुष्यसमाजाच्या विकासासाठी कोणी परमेश्वरी शक्ती असण्याची मला शक्यताही दिसत नाही आणि आवश्यकताही दिसत नाही. काही समजले असे आज वाटते, उद्या कदाचित आज.

अंगारमळा । १५०