पान:अंगारमळा (Angarmala).pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वैदू-भोंदूच्या प्रभावाच्या कथा रचाव्या लागतात आणि स्वत:लाही त्यावर विश्वास ठेवावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या पीकबुडीपासून शेतकऱ्याला संरक्षण मिळेल, म्हणजे वास्तविक उत्पादनखर्च भरून निघण्याची शाश्वती मिळेल, त्या दिवशी या शेतकऱ्याला विज्ञाननिष्ठा शिकण्याची गरजच राहणार नाही.

 बरेच स्वयंस्फूर्त कार्यकर्ते हिंदुत्ववादी वा राष्ट्रवादी चळवळीत काम करताना दिसतात. आपला देश हे एक राष्ट्र आहे ही भावना जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, तरीही अनेक विघटनवादी शक्ती देशात आढळतात.

 देशात अशी फुटाफूट का झाली? ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक जातीजमातीतल्या भर उमेदीतल्या तरुणांनी हसत हसत मरणालादेखील कवटाळले त्या देशातल्या तरुणांच्या मनातील देशभक्ती एकदम आटून गेली कशी? पाकिस्तानबरोबरच्या लढायांत चारचार वेळा इतर जवानांच्या बरोबरीने लढणारा शीख तरुण सगळ्या 'हिंदुस्थान' बद्दल एकदम एवढ्या चिडीने का बोलू लागला? भारतीय लष्करात परम शौर्य गाजवणारे गुरखे एकदम एवढे नाराज का झाले? मुस्लिम जमातीचा प्रश्न आणि दलितांचा प्रश्न पेटतच का राहिला?

 हिंदू आणि मुसलमान यांच्यातील प्रश्न सोडवणे खरोखरच बिकट आहे. मुसलमान जमातीचे काही मूठभर नेते शहरात राहतात, व्यापार-धंदा करतात आणि त्यांतील काही चांगले धनाढ्यही आहेत; पण सर्वसाधारण मुसलमान दलितांपेक्षाही दलित आहेत. खरे सांगायचे तर त्यांच्यातील अनेकांचे पूर्वज भणंग दारिद्यामुळेच धर्मांतराकडे वळले. धर्म बदलल्याने आर्थिक हलाखी संपली नाही; पण इस्लामने थोड्या प्रमाणात 'माणूस' म्हणून मान आणि अभिमान दिला. गावातला मुलाणी, छोटा शेतकरी, कारागीर, विणकर, रिक्षावाले आणि छोट्यामोठ्या कारखान्यांत काम करणारा असंघटित मजूर हे भारतातल्या मुसलमानांचे प्रातिनिधिक चित्र आहे. दलितांना मिळणाऱ्या सोयीसवलतीही त्यांना नाहीत. बहुसंख्यक समाज त्यांच्याकडे संशयाने पाहतो. संशयातून दुरावा तयार होतो आणि त्यातून पुन्हा संशय- अशा दुष्टचक्रामुळे दोन समाजांत एक अक्राळविक्राळ दरी सतत रुंदावते आहे.

 भूमिहीन शेतकऱ्यांचे आणि छोट्या कारागिरांचे प्रश्न सुटल्याखेरीज सर्वसामान्य मुसलमानाच्या मनातील असुरक्षिततेची आणि कोंडले गेल्याची भावना दूर होणे कठीण आहे. मग तो सहजपणे विकासापेक्षा 'आखिरात' जास्त महत्त्वाची आहे असे निकराने सांगू लागतो. या वातावरणाचा फायदा त्यांचे शहरी पुढारी घेतात. परिणामत:,

अंगारमळा । १४९