पान:अंगारमळा (Angarmala).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समजलेले सारेच चूक आहे असे ध्यानात येईल तर तेही मानायची माझी तयारी आहे. प्रत्यक्ष अनुभवाने, क्षणाक्षणाने आणि कणाकणाने जग समजण्याची पराकाष्ठा करणारा मी एक यात्रिक आहे.

 माझ्यासारखा माणूस कोणत्याही धर्मात चालण्यासारखा नाही. प्रत्येक धर्माची एक पोथी असते, एक प्रेषित असतो आणि त्याने मांडलेली आचारविचारांची एक नैतिकता असते. ज्या काळात पोथी लिहिली गेली, तो काळ सगळा बदलला तरी प्रेषितांचे उत्तराधिकारी त्याच आचरणनियमांचा आग्रह धरतात. यहुदी, खिस्ती, मुसलमान हे असे बांधीव धर्म आहेत. त्यांच्यात माझ्यासारख्या यात्रिकाला जागा नाही.

 पण माझ्यासारखा यात्रिक हिंदू राहू शकतो. नरबलींनी चामुंडा मातेला प्रसन्न करू पाहणाऱ्या अघोर भक्तापासून, श्वासोच्छ्वासात जंतू तर मरत नाहीत ना अशी चिंता बाळगणाऱ्या साधूंपर्यंत कोणीही हिंदू असू शकतो. कारण, हजारो वर्षे हिंदू हा शब्द एका खुल्या प्रयोगशाळेचे नाव आहे. हिंदू हा बंधने घालणारा बांधीव धर्म नाही. हिंदू ही एक संस्कृती आहे.

 मुसलमानी आक्रमण यशस्वी झाले, इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात प्रस्थापित झाले याची एक प्रतिक्रिया आत्मपरीक्षणाची होती. हिंदू समाजातील दोष काय, त्यातील अन्याय कोणते यांचा विचार करून असे सारे अनाचार दूर करावे अशी मांडणी जोतिबा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, गोपाळ गणेश आगरकर इत्यादींनी समाजावर आसूड उडवून, लोकनिंदेची कदर न करता केली. दुसरी एक प्रतिक्रिया अगदी वेगळ्या टोकाची. हिंदू धर्मात आणि संस्कृतीत दोष असे काहीच नाहीत, चक्रनेमिक्रमाने आपले गाडगे सध्या खाली आले आहे, ते यथावकाश वर जाईल; इतिहासातून धडा घ्यायचा असला तर तो एवढाच, की पिंड आणि ब्रह्मांड यांचे अद्वैत मानून आराधनेचे मार्ग व्यक्तिनिष्ठ न ठेवता सामूहिक करावेत आणि ब्रह्म आणि जीवात्मा यांच्यामध्ये एक 'राष्ट्र' नावाची जाणीव तयार करावी अशी मांडणी विवेकानंदांपासून ते गोळवलकर गुरुजी, सावरकर ते थेट आजचे विश्व हिंदू परिषदेचे नेते यांनी केली.

 तरी हिंदू समाज अविचलित राहिला. जातीय दंगली झाल्या, पाकिस्तान झाले, अनुनयाचे राजकारण झाले, हिंदू प्रतिशोधाचेही राजकारण झाले तरीही हिंदुबहुसंख्य देशात मुसलमान राष्ट्राध्यक्ष, शीख पंतप्रधान आणि रोमन कॅथॉलिक महिला राज्यकर्त्यापक्षाची अध्यक्षा हे फक्त हिंदू बहुसंख्य देशातच संभवते. असे उदाहरण जगात इतरत्र कोठेही दिसणार नाही.

अंगारमळा । १५१