पान:अंगारमळा (Angarmala).pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उठवताना दिसतात. त्यांची मूळ भूमिकाच मला चुकीची वाटते. या देशातील शेतीचे प्रश्न मिटायचे असतील, अगदी प्यायच्या पाण्याचा प्रश्नही मिटायचा असेल, तर त्यासाठी अशी मोठी धरणे बांधणे अपरिहार्य आहे. असे असतानासुद्धा दोन-चार व्यक्ती केवळ आपले नाव दुमदुमत राहावे, आपला लौकिक वाढावा, या एकमेव भूमिकेतून या आंदोलनांमध्ये अग्रभागी असलेल्या दिसतात. सर्व प्रसारमध्यमांमधून या मंडळींना, त्यांच्यामागे फारसा जनाधार नसतानाही, अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. मी नुकताच तीन आठवडे गुजरातेत राहून आलो. आठ-दहा दिवसांनी परत मी तिकडेच जाणार आहे. तिथल्या, विशेषत: सौराष्ट्रातील, जनतेचे पाण्याविना चाललेले हाल मी स्वत: पाहिले आहेत. राज्यातल्या तमाम जनतेकडे दुर्लक्ष करून काही संधिसाधू समाजकार्यकर्ते धरणविरोधी भूमिका घेत आहेत. मूठभर माणसांनी सगळ्या समाजाला वेठीस धरण्यातला हा प्रकार आहे. या मंडळींच्या हुशारीचे तसे कौतुक करावेसे वाटते! स्वत:ला महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून आंदोलन छेडताना, आपल्याला केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही भरपूर प्रसिद्धी मिळेल, असेच क्षेत्र यांनी आंदोलनासाठी निवडले.धरणांना विरोध करणारी एक मोठी लॉबी आज जगभर कार्यरत आहे. या आंदोलकांना या लॉबीचा पुरेपूर फायदा मिळालेला आहे.

 स्वयंस्फूर्त कार्याचे दुसरे क्षेत्र म्हणजे अंधश्रद्धानिर्मूलन. अंधश्रद्धा ही नेहमीच भोवतालच्या वास्तवाशी निगडित असते. अनिश्चितता आणि अज्ञान यांतून ती जन्माला येते. हे वास्तव बदलल्याशिवाय, केवळ आंदोलन करून ती दूर होईल असे समजणे, हीच मोठी अंधश्रद्धा आहे. नुसत्या शिक्षणाचा प्रसारही यासाठी पुरेसा नाही. तसे असते तर देशातील असंख्य बाबा-महाराजांसमोर आज जी उद्योजकांची, शास्त्रज्ञांची, पदवीधरांची गर्दी दिसते ती दिसली नसती.

 देशातील बहुसंख्य समाज हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या सर्व श्रद्धा शेतीच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. पावसाच्या अनिश्चिततेमुळे विज्ञाननिष्ठा शेतकऱ्यांच्या अंगी बाणूच शकत नाही. शेतातले पीक आणि परिणामत: कच्च्याबच्च्यांचे जीवनच पावसाच्या पडण्यावर वा न पडण्यावर अवलंबून आहे. या जाणिवेमुळे विज्ञाननिष्ठा त्याच्या बुद्धीला पटली तरी मनाला पटू शकणार नाही. आधुनिक औषधोपचार जवळपास उपलब्ध नाहीत, असले तरी परवडत नाहीत, म्हणून तर त्याला जवळ असेल त्या वैदू-भोंदूचे औषधपाणी करावे लागते. आपल्या प्रियजनांना यातले उत्तमातले उत्तम औषधपाणी करणे आपल्याला जमले नाही, ही मनाला घरे पाडणारी जाणीव विसरण्यासाठी

अंगारमळा । १४८