पान:अंगारमळा (Angarmala).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बस करा हे समाजसेवेचे ढोंग!


 'अंतर्नाद'च्या १९९९ च्या दिवाळी अंकासाठी 'स्वयंस्फूर्त कार्याचे समाजजीवनातील स्थान' या विषयावर मी लिहावे अशी विनंती भानू काळे यांनी मला तीन-एक महिन्यांपूर्वी केली होती. माझी प्रकृती, निवडणुकीची धामधूम, वेगवेगळे दौरे यांमुळे हे लेखन मागे पडत गेले.आता अंकछपाईला द्यायची वेळ आली असल्याने हे काम मला हाती घ्यावेच लागले.

 खरे सांगायचे तर, हे काम मागे पडायचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे या विषयावरील माझी मते इतकी धक्कादायक आहेत, की अंतर्नादच्या संपादकांना, तसेच अंकाच्या वाचकांनाही ती कितपत भावतील याविषयी मी साशंक आहे. असो.

 "स्वयंस्फूर्त कार्य याचा अर्थ या अंकापूरता सामाजिक कार्य किंवा सेवाकार्य असा घ्यावा, इग्रजीतील Voluntary work या अर्थाने येथे स्वयंस्फूर्त कार्य हा शब्दप्रयोग योजलेला आहे."असा खुलासा संपादकांनी केलेला आहे. अशा अर्थाने केल्या जाणाऱ्या स्वयंस्फूर्त कार्याची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. याच्या स्पष्टीकरणार्थ मी यापुढे जे लिहिणार आहे, त्यातील काही विचार मी अन्य संदर्भात इतरत्रही अधूनमधून व्यक्त केलेले आहेत, तर काही विचार मी या ठिकाणी प्रथमच मांडत आहे. मुळात या विषयावर एकत्रितरीत्या माझे विचार मी प्रथमच मांडत आहे. तरीही हा विषय तसा माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचाही आहे.

 ज्याला आपण स्वयंस्फूर्त कार्य म्हणतो अशा प्रकारच्या सर्व कार्यांमागील दृष्टिकोन महाभारतातील पुढील श्लोकात व्यक्त केला गेला आहे.

न त्वहं कामये राज्यम् न स्वर्गम् नापुनर्भवम्
कामये दु:खतप्तानां प्राणिनाम आर्तिनाशनम् ॥

 (मला राज्य, स्वर्ग, मोक्ष हे काही नको. दुःखाने तप्त अशा प्राणिमात्रांचे आर्ति म्हणजे संकट वा दु:ख दूर करणे एवढीच माझी कामना आहे.)

 या दृष्टिकोनातून काही कार्य करणे हे मला अजिबात न पटणारे आहे. त्यामुळे या सर्व स्वयंस्फूर्त कार्याला माझा तत्त्वश:च विरोध आहे, परंतु त्यापूर्वी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या स्वयंस्फूर्त कार्याचा आपण जरा थोडक्यात आढावा घेऊ.

 बरेच स्वयंस्फूर्त कार्य आज पर्यावरणाच्या क्षेत्रात चालू आहे. सामान्यत: या मंडळींचा मोठी धरणं बांधायला विरोध असतो. अनेक बडी बडी मंडळी या प्रश्नावर आपला आवाज

अंगारमळा । १४७