पान:अंगारमळा (Angarmala).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संघटनेचं काम सुरू केलं तेव्हा माझ्या कुटुंबातील सर्वांनी, मी कामातून गेलो असंच म्हटलं. माझ्या बायकोनं तिच्या बहिणीला मी काय करतो आहे, कसं चांगलं काम करतो आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती बहीण म्हणाली, "हे शेतकरी दुःखी कष्टी वगैरे असतात हे काही खरं नाही. त्या लोकांना असं जगायची सवयच असते." 'आम्हाला ताट वाढून आलं नाही तर मोठं दु:ख होतं आणि त्यांना भाकरी मिळाली नाही तरी त्यांना दु:ख होत नाही कारण त्यांना उपासमारीची सवय असते.' ही भावना नागरी संस्कृतीची आहे.

 आणि थोडं तथ्यही असावं त्यात ! भाकरी नाही मिळाली, कर्ज नाही मिळालं तर शेतकरी लोक आत्महत्या करतात आणि ज्यांना संध्याकाळची व्हिस्की मिळाली नाही, त्यांनी राज्यक्रांत्या केल्या, सरकारं उलथवून टाकली; मग आता कोणती गरज मोठी म्हणायची ? शेतकऱ्यांच्या जीवनात हे असं चालायचंच, त्यांनी धान्य काढायचंच असतं, ते आपल्याला पुरवायचंच असतं, त्याचा विचार अधिक करू नये, केला तर क्लेशदायकच असतो असा विचार करून म्हणा किंवा काही म्हणा, शेतकऱ्यांविषयी नागरी समाजानं आपली मनं बधिर करून घेतली आहेत; मग त्या समाजातलं ते कलाक्षेत्र असो, नाट्य असो, काव्य असो, सगीत असो का साहित्य असो. नागरी समाजाच्या. ग्रामीण जनतेबद्दलच्या करुणेच्या सहभावनेच्या इंद्रियाला आलेली बधिरता दूर होणे, ही सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता आहे.

 ही बधिरता जर आपल्याला दूर करता आली तर ग्रामीण साहित्य हे प्रभावशाली होऊ शकतं. ते करण्याचा एकमेव मार्ग आहे- बापाकडून जर का त्यांना बऱ्यापैकी जमीन मिळणार असेल तर महाराष्ट्रातल्या देशमुखांघरची पोरं बापासमोर बसत नाहीत; पण जर का बापाकडनं काहीच मिळण्यासारखं नसेल तर ती बापाला विचारतसुद्धा नाहीत. शरयू दप्तरींनी एका ठिकाणी म्हटले आहे, "आपली सारी संस्कृती शेतकऱ्याला गरजू ठेवण्यामुळे टिकून आहे." ज्या दिवशी शेतकरी म्हणू शकेल, की आमचं पीक व्यवस्थित आलं, पोती नीट भरली, कणगीला लावून ठेवली, जेव्हा चांगला बाजार येईल तेव्हा बघू. त्या दिवशी शेतकरी हा गरजू जनावर नाही, तो माणूस आहे अशी जाणीव तयार होईल आणि त्यादिवशी सहभावनेचे झरे पुन्हा वाहू लागतील.


 (शेतकरी संघटक, ३ ऑगस्ट १९९८- इस्लामपूर येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात शरद जोशी यांनी केलेले भाषण.)

■ ■  

अंगारमळा । १३०