पान:अंगारमळा (Angarmala).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसऱ्याविषयी करुणा असणं, सहानुभूती असणं ही माणसाची उपजत प्रेरणा आहे. आपण हळूहळू हुशारीहुशारीनं आपल्या करुणेवर पांघरूण घालात आलो. 'मदर तेरेसा' वेगळी. रस्त्यावर कितीही मरणारे दिसले तर ते उचलून घेऊन जातात. आपण दररोजच्या कामातली माणसं. आपण काय करतो? आपण विचार करतो, एकदा थांबलो होतो; आता थांबलो तर उशीर होईल. साहेब रागावेल आणि म्हणून तिथून पुढे निघतो. मग आपण मनाला शिकवतो, मनामध्ये उत्पन्न होणारी करुणेची भावना झाकून टाकायला शिकवतो.

 हिंदु-मुसलमान दंगा झाला तर हिंदू मेला का मुसलमान मेला, बलात्कार झालेली बहीण हिंदू होती का मुसलमान याने काय फरक पडतो? पण कोणी सांगितलं, "दंगा झाला" की आपण विचारतो "किती मेले आज?", सांगणारा सांगतो, "बावन्न." मग आपण विचारतो, "त्यांचे किती? आणि आपले किती?" जणू काही क्रिकेटचा स्कोअर आहे. कारण, आपल्या संस्कृतीने आपल्याला जे आपल्या धर्माचे नाहीत त्यांच्याविषयी करुणा बाळगायची नाही अशी मन बधिर करायची कला शिकवली आहे. पाकिस्तानातही हिंदुस्थानच्या लोकांविषयी बधिरता तयार झाली आहे. नागरी समाज आणि शेतकरी यांच्यामध्ये अशी बधिरता आणण्याचा कार्यक्रम चाललेला असतो आणि माझ्या मते, ग्रामीण साहित्य प्रभावशाली न होण्याचं सर्वांत मोठं कारण हे आहे. नगरे आणि खेडी यांच्यातला संघर्ष फार जुना आहे. मार्क्सने त्याबद्दल लिहिलं आहे, गांधीजींनीही लिहिलं आह; पण आज फ्रान्समध्ये, जपानमध्ये, अमेरिकेमध्ये शेतकरी विरुद्ध नागरी किंवा शेतकरी विरुद्ध बिगरशेतकरी हा संघर्ष संपलेला दिसतो. त्याचं कारण, आज या सगळ्या सुधारलेल्या देशांमध्ये शेती तोट्याची नाही, इतकेच नव्हे तर शेतीला सबसिडी दिली जाते- जपानमध्ये ८० %, युरोपमध्ये ६० %, अमेरिकमेध्ये ३५ %- लोकांनी शेतकरी राहावं म्हणून. गाव विरुद्ध शहर हा वाद या सगळ्या देशांमध्ये मिटला. हिंदुस्थानात अजूनही शेतीला उणे बहात्तर टक्के सबसिडी का आहे?

 सगळ्या जगामध्ये शेती आणि बिगरशेती यांच्यामध्ये दोन फरक आहेत. एक म्हणजे शेतीच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे, शेतीची शैलीच वेगळी आहे आणि दुसरा, शेतीचा भूगोल वेगळा आहे. शेतकरी सगळे खेडेगावांत असतात आणि नागरी संस्कृतीचे लोक, मग ते वेशीच्या आतले असोत बाहेरचे असोत, ते वेगळे असतात.

 हिंदुस्थानात, दुर्दैवाने, आणखी एक तिसरा फार मोठा फरक आहे. तो फरक आहे जातीचा. शेती करणारांची जात वेगळी आहे आणि त्यामुळे शेतकरी समाजाविषयी शहरातील बहुतेक लोकांनी आपली मनं बधिर करून घेतलेली आहेत. मी जेव्हा शेतकरी

अंगारमळा । १२९