पान:अंगारमळा (Angarmala).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पुस्तकांना सरकारी आश्रय हीही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नवनवीनता नाही; वर्षावर्षाला चक्र तेच आहे. मनुष्याच्या आयुष्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट हवा; पण या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीला काही किंमत पडत नाही कारण ती सदासर्वकाळ सहज उपलब्ध असते. जी वस्तू सहजी उपलब्ध होत नाही तिचा जितका तुटवडा तितकी तिची किंमत वाढते. बाळाचा जन्म होणे हे सगळ्यांत मौल्यवान उत्पादन, मोठा चमत्कारच असतो तो; पण,एवढा चमत्कार फार वेळा होतो म्हणून आपण तक्रार करतो आणि कुटुंबनियोजन करतो. एवढंच नव्हे तर एवढं महत्त्वाचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना काहीच महत्त्व नाही. ज्या कारणाने बाईच्या उत्पादनाला महत्त्व नाही त्याच कारणानं शेतकऱ्याच्या उत्पादनाला महत्त्व नाही. किंबहुना शेतकरी आणि बाई या दोघांची परिस्थिती सारखीच असते. शेतकरी हा देशाची 'बायको' आहे असं समजलं तर यामागचं सगळं कोडं समजेल. तुम्ही उत्पादन करता ते महत्त्वाचं आहे, पण त्यात जर नवनवीनता नसेल तर त्याला महत्त्व येण्याची शक्यता नाही आणि साहित्यिकांचं, कलाकारांचं काम नवनवीन असेल त्याचा उन्मेष दाखवणं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.

 सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ॲडम स्मिथचा मी भक्त आहे. १७ व्या शतकामध्ये इथे शिवाजी महाराज जेव्हा इतिहास घडवीत होते त्याच वेळी त्याचं — wealth of the Nation (राष्ट्राची संपत्ती)' सारखं पुस्तक लिहिलं गेलं, हे मला मोठं अदभुत वाटतं; पण ॲडम स्मिथनं आणखी एक पुस्तक लिहिलं, त्याची माहिती फार थोड्या लोकांना आहे. या पुस्तकाचं नाव आहे 'Theory of Moral Sentiment '. मनुष्याला स्वार्थाची भावना आहे का? जो तो स्वार्थाकरिताच धावतो काय?

 बाजारपेठेचं तत्त्वज्ञान सांगणारा ॲडम स्मिथ म्हणतो, 'नाही. मनुष्याला स्वार्थ ही जितकी उपजत प्रेरणा आहे तितकीच सहानुभूती आणि करुणेची नैसर्गिक प्रेरणा असते.' तुम्ही कुणाचं दु:ख पाहिलं तर कसं पाहता? तुम्हाला दुसऱ्याचं दु:ख पाहून दु:ख का होतं? कारण, आपल्या बुद्धीची रचनाच अशी असते, की अपण स्वत: त्या माणसाच्या जागी आहोत अशी कल्पना करतो. एखाद्या माणसाला जखम झालेली पाहिली, की आपल्याला अशी जखम झाली तर काय होईल या कल्पनेत आपण जातो. म्हणून तर डॉक्टर टाके घालीत असताना ते पाहणारे चक्कर येऊन पडतात. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मुद्दामहून सांगतात, की टाके घालताना आपण माणसाच्या शरीराला टाके घालत नसून एखाद्या ज्वारीच्या पोत्याला टाके घालतो आहोत अशी कल्पना करा.

अंगारमळा । १२८