पान:अंगारमळा (Angarmala).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिहायला लागतील. ग्रामीण भागामध्ये कादंबऱ्यांचा खप एक कोटीचा आहे असं झालं तर हे अशक्य नाही. तेव्हा, साहित्यिकांना ग्रामीण साहित्य लिहिण्यास उद्युक्त करायचे झाले तर त्यासाठी मी काही संमेलनांत आणि परिषदांत जाणार नाही.

 आपण जे जमलो आहोत ते त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करायला. शेतकरी आणि नागरी समाजांमध्ये ही अशा तऱ्हेची भिंत तयार का व्हावी?

 पहिलं कारण, शेतकरी हा वाचण्यात आणि लिहिण्यात, दोन्हींतही कच्चा आहे. म्हणजे, पुस्तक लिहिणं हे काही शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं साधन नाही. भजन, कीर्तनं, तमाशे, लावणी अशाच साधनांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येतं ही फार जुनी परंपरा आहे. 'लिहिणारा ब्राह्मण, गाणारा महार, नाचणारी महारीण' ही फार जुनी परंपरा आहे. त्यात, कुणबी किंवा शहाण्णव कुळीच्या मराठ्याने कविता लिहिल्या असं काही कुठं दिसत नाही. तात्पर्य असं, की शेती करणाऱ्या ज्या काही जाती आहेत त्यांचा लिखाणाशी काही संबंध नाही; भजनं करतील, कीर्तनं ऐकतील, वारीला जातील, संत वाङ्मय पाठ असेल हे सगळं खरं; पण हे श्रवणभक्तीनं आलेलं आहे, लिखाणावाचनाने नाही.\

 दुसरा मुद्दा. मराठीतील पुस्तकं सगळ्यात जास्त कोण वाचतो? मंबईतील लोकल गाडीत बसलेला मनुष्य तासभरच्या प्रवासात वाचतो. त्यामुळे, मराठीतील सर्वश्रेष्ठ, जास्तीत जास्त खप असणारे साहित्यकार आहेत ते रहस्यकथा किंवा पाणचट कथा लिहिणारे आहेत. शेतकरी वाचत नाही तर त्याच्या बाजूनं लिहिलेलं साहित्य प्रकाशक कसे काय प्रकाशित करणार? शेवटी व्यवहार आहेच. पुस्तकाची बाजारपेठ ही शहरी आहे. त्यानंतर, सगळ्यांना मान्य करावं लागेल की, बहुतेक साहित्यिक नोकरदार आहेत, त्यांतलेही बहुतेक प्राध्यापक आहेत. अर्थशास्त्रीसुद्धा जवळजवळ सगळे प्राध्यापक आहेत. आणि शेवटी शेतकऱ्याचा पोटचा मुलगा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गेला, की तो बापाचीसुद्धा कीव करीत नाही. ज्याचं पोट शेतावर आहे तोच फक्त आपल्या शेतकरी बापाची काळजी करतो; दुसऱ्या व्यवसायात गेलेला कुणी करीत नाही. त्या नोकरदाराने आपल्या आईबापाचं दु:ख कितीही आठवून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी त्यात प्रतिभा थोडीच उतरणार आहे? माओ त्से तुंगने म्हटलं की 'पर्मनंट रिव्होल्युशन' तरी ते अशक्य आहे. तुमची राहण्याची स्थिती सुधारली, घरात टेलिव्हिजन आला, दारापुढं गाडी आली, छानशी बायको आली, की क्रांती करू नये असं वाटतं! तेव्हा, माझी सर्व ऐहिक परिस्थिती बदलली, सुधारली तरीसुद्धा माझ्या विचारात फरक पडत नाही असं कोणी म्हणेल तर तरे खरं नाही. परिस्थिती बदलल्यानंतर मनुष्य बदलणारच.

अंगारमळा । १२७