पान:अंगारमळा (Angarmala).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पहिली गावामध्ये वाडा, वाडी, वस्ती हा भेद नको. आठ बैलांचा ज्याचा बारदाना आहे अशा शेतकऱ्याच्या घरची काय दुरवस्था आहे हे त्यांनी सविस्तरपणे सांगितलं; संघर्ष आहे तो शूद्र आणि भटशाहीतला आहे, वाडी-वस्तीतला नाही.

 दुसरी सरहद्द. हिंदु-मुसलमान वाद खोटा. 'महंमदाचे जवांमर्द शिष्य' जेव्हा हिंदुस्थानात आले तेव्हा कुणब्यांनी त्यांचं स्वागत केलं, हे त्यांनी रोखठोकपणे सांगितलं आजसुद्धा असं म्हणायची कोणी हिंमत करीत नाही.

 आणि तिसरी. इंग्रज आले तरीसुद्धा पाश्चिमात्य संस्कृतीचा फायदा आपल्याकडच्याः सर्व जातीजमातींना मिळाला पाहिजे.

 अशा तऱ्हेने गावातले अंतर्गत भेद बाजूला टाका, हिंदू-मुसलमान भेद बाजूला टाका राष्ट्र आणि परराष्ट्र असा भाव न ठेवता विद्येचा अवलंब करा असं सागणारा विशाल दृष्टीचा, खुल्या मतवादाचा पाईक जोतिबांच्या रूपाने आपल्यासमोर आला. शेतकरी संघटनेमध्ये आम्ही जोतिबा फुल्यांचंच काम चालवतो आहोत, हे मी सुरवातीपासूनच सांगत आलो आहे.

 जोतिबा फुल्यांचा पराभव झाला आणि मग काय झालं? जोतिबांच्या विचारातील काही भागाचं महत्त्व फार वाढवलं. उदाहरणार्थ जातिवाद. त्यापलीकडे, समाजवादाचं खूळ सगळीकडे पसरलं तेव्हा जोतिबा फुले आणि समाजवाद असं मिश्रण तयार केलं गेलं: त्यापढे जाऊन फुले, आंबेडकर, मार्क्स असं काहीही! जे जे चटपटीत असेल त्याची भेळ करा, इथे खपते ! फुले आणि मार्क्स यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे, तो लक्षात न घेता फुल्यांच्या विचाराला मार्क्सवादाचं झापड लावून सामूहिक पुरुषार्थाच्या कल्पना त्यामध्ये टाकल्यामुळे फुले मागे पडले. शेतकरी संघटनेने महात्मा फुल्यांचा आत्मा जपला, व्यक्तिस्वातंत्र्याची निष्ठाही जपली आणि त्यांच्या सहा कार्यक्रमांपैकी 'शेतीमालाचा भाव' हा कार्यक्रम घेऊन पुढे मार्गक्रमण सुरू केलं. आता आम्हीही थकलो.

 आज आपण या ठिकाणी विचार करायला जमलो. तुम्ही साहित्यिकांनी 'साहित्य कामाठी' करावी अशी माझी मुळीच इच्छा नाही. कारण तुमच्या व्यक्तिस्वातंत्र्याची चिंता तुमच्यापेक्षाही मला जास्त आहे. तुम्हाला आतून ऊर्मी येऊन या प्रश्नावर काही लिहावंसं वाटलं तरच लिहा, नाही तर, खुद्द शरद जोशींनीसुद्धा कधी चुकून सांगितलं 'लिहा' तरी लिहू नका. तुम्हाला लिहायला लावायचंच असं ठरलं तर मी काय करीन? मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन, की प्रत्येक शेतकरी कुटुंबाने दरवर्षी निदान एक मराठी कादंबरी घ्यावी. तुम्हीच काय, गंगाधर गाडगीळ आणि व.पु. काळेसुद्धा ग्रामीण कथा

अंगारमळा । १२६