पान:अंगारमळा (Angarmala).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माणसामाणसापर्यंत पोहोचू द्या. मग, आपण इंग्रजांना काढून लावू या. वासुदेव बळवंत फडके रामोशांच्या मुलांची डोकी फिरवून इंग्रजांना विरोध करतो आहे असे जोतिबा फुल्यांनी स्पष्टपणे मांडले. 'जोपर्यंत राष्ट्र एक नाही 'एकमय लोक' या अर्थी राष्ट्र नाही तोपर्यंत 'न्याशनल काँग्रेस' कसली काढता?' असा परखड प्रश्न त्यांनी केला. लोकांना 'अविद्ये'चे अंकितच ठेवून स्वातंत्र्याची चळवळ केली आणि स्वातंत्र्य मिळालं, तर इथे पुन्हा पेशवाई अवतरेल हे सांगणारा महात्मा शंभर वर्षांपूर्वी होऊन गेला.

 जोतिबा फुल्यांचा पहिला पराभव राष्ट्रवाद्यांनी केला. ते म्हणाले, आपल्यातलं जातीयवादाचं प्रकरण आपण नंतर बघून घेऊत, लोकांना विद्या द्यायचं कामही नंतर करू; पण परदेशी संस्कृतीचा, परदेशी तंत्रज्ञानाचा वारा आमच्याकडच्या खालच्या जातीच्या लोकांना मिळता कामा नये; म्हणून त्यांनी ओरडा केला, 'राष्ट्र महत्त्वाचं आहे, स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे' आणि जोतिबा फुल्यांचा पहिला पराभव झाला.

 स्वातंत्र्य मिळालं. शेतकरी समाज सगळा स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी समाजाला वाटलं, की आतातरी शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य येईल, आतातरी विद्येचा प्रवाह आमच्यापर्यंत येईल. सरकारनं सांगितलं की विद्येचा प्रवाह तुमच्यापर्यंत आवश्य येईल पण तो खळाळत वाहणारा नसेल. आमच्या शिक्षणखात्याच्या डबक्यातून जेवढं पाणी तुमच्याकडे सुटेल तेवढंच घ्या; जगाशी तुमचा संबंध नाही. पहिल्यांदा जोतिबांचा पराभव झाला राष्ट्रवादाच्या नावानं; १९४७ मध्ये त्यांचा पुन्हा पराभव झाला आणि समाजवादाच्या नावाखाली देश स्वावलंबी बनविण्याच्या कल्पनेने पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे दरवाजे बंद झाले.

 १९९१ मध्ये समाजवादाचे वाटोळे झाले आणि आता पुन्हा एकदा खुले वातावरण येईल, बाहेरच्या तंत्रज्ञानाशी लोहार, मिस्त्री, तांबट अशांसारख्यांचा संबंध येईल म्हटल्याबरोबर पुन्हा राष्ट्रवादी उठू लागले आहेत, स्वदेशीवाले उठू लागले आहेत. जोतिबांचा तिसऱ्यांदा पराभव होतो आहे.

 मी स्वत:ला जोतिबांची पताका घेऊन जाणारा समजतो. मी फार थोड्या लोकांना मानतो. जोतिबांना मानतो ते व्यक्तिपूजा म्हणून नाही. जोतिबांनी जे काही लिहिले आहे त्यातले सात-आठ टक्केच मला मान्य आहे; पण शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्यातील तुम्हाला सात-आठ टक्के पटावं ही काही लहानसहान बाब नाही.

 जोतिबांच्या विचारात मला सापडलेले काही महत्त्वाचे पैलू सांगतो. जोतिबा फुल्यांनी तीन सरहद्दी ओलांडायला सांगितल्या.

अंगारमळा । १२५