पान:अंगारमळा (Angarmala).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साहित्य म्हणजे जणू विनोदी विषय आहे. या साहित्यातील शेतकरी म्हणजे कुठे गण्याभामट्या किंवा पाटलाचा पोर- खांद्यावर बंदूक टाकून जुलूम करणारा नाही तर सोंगाड्या किंवा विदूषक किंवा थोडाफार अर्धवट. ग्रामीण साहित्यामध्ये जिवंत भाडामांसाचं चित्रण फार कमी होतं; Characterization(व्यक्तिचित्रण) कमी होतं, caricaturingच (विद्रूपीकरण) जास्त होतं. म्हणजे लेखक काही गुण मनात धरतो आणि एखादी व्यक्ती म्हणजे त्या गुणांचं मूर्तिमंत रूप असं धरून पहिल्या पानापासून तीनशे बावन्नाव्या पानापर्यंत त्या व्यक्तीची तीच गुणवत्ता कायम ठेवून मांडणी करतो.

 शेतकरी संघटनेमध्ये एकेका वेळी लाखांनी माणसं आंदोलनात उतरली; सभांना जमली, शहरामध्ये जाऊन पराभूत होऊन परतलेला, पायजमा घालणारा शेतकऱ्याचा मुलगा या संघटनेचा पाईक आहे. याच्या ऊर्मी काय? घरचे सर्व पैसे खर्च करून हा का धावतो आहे? मला प्रश्न पडतो, की या शेतकरी तरुणाचं चित्रण का झालं नाही? त्यापलीकडे, शेतकरी महिला आघाडीचं काम आहे. दोन लाख महिलांच्या नावावर जमिनी करून दिल्या. तुम्ही शेतकरी बायांना विचारलं तर त्या सांगतील, की 'चांदवडच्या महिला अधिवेशना'नंतर आम्हाला, पहिल्यांदा, माणूस म्हणून जगायला मिळालं; आधी आमची घरची माणसंसुद्धा आम्हाला माणसासारखं वागवत नव्हती. या महिलेचं चित्रण साहित्यामध्ये का नाही दिसत? तसंच आणखी एक पात्र आहे; महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिकलेली बी.ए., एम.ए. झालेली, थोडाफार पैसा हाती असलेली मुलं आली, एखाद्या आंदोलनामध्ये तडफेने चमकली आणि दुसऱ्या आंदोलनाच्या वेळी चमत्कार असा घडला, की ती राज्यकर्त्या पक्षात सामील झाली. आपल्या साहित्यात त्याचं प्रतिबिंब कुठंतरी पडायला काय हरकत आहे? सत्तर टक्के शेतकरी आहेत म्हणजे सत्तर टक्के साहित्य शेतकऱ्यांचंच असलं पाहिजे असा काही माझा आग्रह नाही. किंबहुना, ते तसं असूही शकणार नाही. कारण, साहित्य हा सौंदर्याच्या आविष्काराचा भाग आहे आणि सौंदर्याची व्याख्या,

 क्षणेक्षणेऽयं नवतामुपैति । तदैव रूपम् रमणीयताय: ।। अशी आहे. सतत बदलत असतं तिथं सौंदर्याचा साक्षात्कार होतो आणि त्याच्या आविष्कारातून साहित्यकृती जन्माला येते. आपण आजूबाजूला वावरत असताना संदर्भाने महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात, त्याच नोंदल्या जातात. उदाहरणार्थ, एखादा रहदारीचा रस्ता ओलांडताना डावीउजवीकडून येणारी सगळी वाहने आपल्या नजरेसमोरून जातात, पण एकदा का रस्ता ओलांडला आणि कुणी विचारलं, की कशाकशा गाड्या होत्या तर काही सांगता

अंगारमळा । १२३