पान:अंगारमळा (Angarmala).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती भीकदिंडी असते. हे साहित्याला का जाणवले नाही?

 चाकणच्या कांदा आंदोलनाच्या वेळी तेथे जे पोलिस इन्स्पेक्टर होते त्यांची पुढे पुणे स्टेशनला बदली झाली. तेथून ते एकदा मला भेटायला आले. त्यांनी मला सांगितले की पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर दररोज चारपाच तरी अल्पवयीन मुली, खेड्यापाड्यातून आलेल्या, सैरभैर अवस्थेत उतरतात. नंतर त्या दिसत नाहीत; पण तपास केल्यानंतर कळले, की शेतीवर राबणाऱ्या आईबापांच्या घरी धड पोट भरत नाही म्हणून घर सोडून काम शोधण्यासाठी आलेल्या या मुली असतात. त्यांच्या या प्रवासाचा शेवट कुंटणखान्यात होतो. घर सोडून आल्यानंतर कुंटणखान्यात जाईपर्यंत त्यांच्या मनाची काय अवस्था असेल? नंतर सबंध आयुष्य त्या मनाच्या कशा अवस्थेत कंठीत असतील? पुण्यामुंबईसारख्या शहरांतील हे वेश्यांचे पिंजरे शेतीमालाला भाव नसल्यामुळे दरिद्री होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनाचे, खेड्यातल्या परिस्थितीचे प्रतीक आहेत. त्याचं चित्र साहित्यात कुठेच उतरलेलं दिसत नाही.

 शेतकऱ्यांच्याबद्दल एक विचित्र गोष्ट लक्षात आली. बहुतेक शेतकऱ्यांच्या घरी एकाच भावाचा संसार धड होतो. दुसऱ्या भावाची बायको माहेरी तरी लावून देतात किंवा त्याची मुलं जगतच नाहीत. मला कळेना, सगळीकडे असं कसं होईल? मग, माझ्या असं लक्षात आलं, की जमिनीचे तुकडे फार पडू नयेत म्हणून शेतकऱ्यांच्या घरामध्ये एकाच भावाचा संसार साधारणपणे धड होतो. हे असं मुद्दाम घडवून आणतात का आणखी काही मार्गाने होतं हे तपासून पाहावे लागेल; पण, आकडेवारीने तपासले तर असे घडते हेच कळून येते. मला 'ग्रामीण' अनुभूतीमध्ये हे दिसत नाही.

 अजून एक गोष्ट माझ्या मनाला बरेच दिवस लागून राहिली आहे.

 शेतकरी आईबाप म्हातारे झाले की त्यांच्या लक्षात येतं, की आपल्या हातून काही काम होत नाही. पोराच्या संसाराला आपण ओझं झालो आहोत. ते म्हातारे आईबाप पोराला म्हणतात. "पोरा, आमचं आता वय झालं, सारा काही संसार पार पडला, तूही आता कर्तासवरता झाला, आता एकच इच्छा राहिली आहे; काशीला मरण यावं आणि देहाचं सोनं व्हावं. एवढी एक इच्छा पुरी करू द्या, नाही म्हणू नका." शेतकऱ्याघरचे म्हताराम्हातारी काशीला जायला निघतात. एखादं बोचकं आणि घेतले तर पाचपन्नास रुपये घेऊन. पोहोचली तर पोहोचली. काशीपंढरपूरसारख्या तीर्थस्थानी पोहोचलीच तर तिथे पुष्कळ धर्मात्मे 'पुण्याय पापक्षालनाय च' भोजनावळी घालत असतात. तिथं जितके दिवस जगता येईल तितके दिवस जगावं आणि काशीला मरण आलं तर सरणाचाही

अंगारमळा । १२१