पान:अंगारमळा (Angarmala).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्षांपूर्वी मी हे मांडायला सुरवात केली तेव्हा वि. म. दांडेकरांपासून सगळ्यांनी विरोध केला. पण आज या विषयावर काही वाद नाही राहिला. आता हिंदुस्थान सरकारने जागतिक व्यापार संघटनेकडे पाठविलेल्या आकडेवारीत कबूल केले आहे, की हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला बाजारपेठेत जितकी किंमत मिळाली असती, त्याच्यापेक्षा ७२ % कमी मिळावी अशी आमची व्यवस्था आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला शेतकऱ्यांचा प्रश्न समजला असं सांगितलं, कुणी बिनधुराच्या चुली काढल्या, कुणी स्वच्छताकूप काढले, कुणी पाणी जिरण्यासाठी शोषखड्डे घेतले, कुणी म्हणाले सुबाभूळ लावा, कुणी म्हणाले संकरित गायी पाळा. यांना सगळ्यांना आमचा विनम्र प्रश्न आहे, की तुमच्या ग्रामोद्धाराच्या या ज्या काही योजना होत्या त्या योजनांमध्ये सरकारने जाणीवपूर्वक ठरविलेली ७२ % लूट भरून काढण्याचा काही मार्ग होता? तुमच्या लक्षात आलं नसेल तर तो काही अक्षम्य गुन्हा नाही; पण आता ते स्पष्ट झाल्यानंतर तुमच्या अहंकारापोटी तुमचंच म्हणणं चालू ठेवलं तर तुमच्या ग्रामीण जीवनाशी सांगितलेल्या निष्ठांबद्दल संशय तयार होतो.

 मी शेती चालू केली तेव्हा पहिल्यांदा बटाटे लावले. खूप तण झालं होतं, डोंगराच्या उताराचा भाग असल्यामुळे. तण काढायला माणसं लावायला पाहिजेत, नाहीतर बटाट्याचं पीक जाणार अशी परिस्थिती उभी राहिली. माणसं शोधायला गेलो तर गावातल्या लोकांनी सांगितलं, की आता तण काढायला कुणी मजूर मिळणार नाहीत; बाया नाहीत आणि पुरुषही नाहीत. का? तर म्हणे, आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि लोक मोठ्या संख्येनं पंढरपूरच्या वारीत चालले आहेत. मला मोठं आश्चर्य वाटलं. ज्या काळात शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रचंड कामं असतात अशा वेळेला लाखो लोकांना उठवून पंढरपूरला घेऊन जाणारी ही भक्तिमार्गाची परंपरा टिकलीच कशी? केवळ विठोबाच्या दर्शनाकरिता ही मंडळी जातात हे काही मला पटेना; मग मी सरळ देहूला गेलो, यात्रेमध्ये सामील झालो आणि एक भयानक विदारक सत्य माझ्यासमोर आलं.

 आमच्या कोरडवाहू भागातील शेतकरी, बियाण्यासाठी कशीबशी बाजूला ठेवले ज्वारी शेतामध्ये कुंकून टाकली, की घरी खायलासुद्धा काही राहत नाही म्हणून वारीमधे जातो आणि वारीच्या पहिल्या दिवसापासून कुठं फुटाणे वाटताहेत, कुठं कुरमुरे वाटताहेत कुठं केळी वाटताहेत त्याच्या आशेवर पुढे पुढे जात राहतो. देहूपासून पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या या यात्रेचा भक्तिसंप्रदायाशी काहीही संबंध नाही, कोरडवाहू भागातल्या उपाशी शेतकऱ्यांची पंढरपूरपर्यंतच्या रस्त्यावरील पाण्याची सोय असलेल्या भागातून जाणा

अंगारमळा । १२०