पान:अंगारमळा (Angarmala).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संबंधांचा काही संदर्भ असतो. माझी भूमिका ही अशी असल्यामुळे माझी पुस्तकं प्रसिद्ध करायला मी काही राजी नव्हतो. त्यामुळे पुस्तकं प्रसिद्ध करण्याचे मी बराच काळ प्रयुक्तीने टाळलं. ज्या लोकांपर्यंत मला पाहोचायचं आहे त्या लोकांपर्यंत मला तोंडच्या शब्दांनीच पोहोचावे लागेल, पुस्तकं वगैरे आधुनिक साधनं कितीही परिणामकारक असली तरी ती काही सगळ्यालोकांपर्यंत पोहोचणार नाहीत याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती-नाही.

 एकदा विनय हर्डीकर भेटले. म्हणाले, "मला काम करायचे आहे. पण, मला शेतीचा अनुभव पाहिजे. तुमची भाषणं ऐकली की आम्हीही तशीच भाषणं करतो, प्रसंगी अधिक सुरस करतो. पण भाषणानंतर शेतकऱ्यांच्या ज्या बैठका होतात त्यात एखाद्यानं शेतीतील एखादी अडचण, समस्या मांडली तर तुमच्याकडे त्यावर उत्तर तयार असतं. असं उत्तर आम्ही देऊ शकत नाही, आम्ही तिथं कमी पडतो." मी हर्डीकरांना सांगितलं की "कोणाही माणसाचं 'मॉडेल' समोर ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला शरद जोशींबद्दल आदर वाटत असेल तर आनंदाची गाष्ट आहे; पण 'शरद जोशी' ही कमीत कमी उंची गाठायची आहे आयुष्यात, हे लक्षात ठवा."

 मी त्यांना म्हटलं, "हिंदुस्थानच्या सगळ्या भाषांमध्ये मला शेतकरी नायक म्हणून कुठं दिसत नाही. साहित्यात शेतकरी म्हणजे दुष्ट, जमीनदाराचा पोरगा, खांद्यावर बंदूक टाकून फिरतो, तमासगिरीणीकडे जातो, पोरी पळवतो किंवा विदूषक असतो, सोंगाड्या असतो; माणसासारखा माणूस हाडामांसाचा शेतकरी मला कोणत्याच साहित्यात सापडत नाही- मराठी नाही, हिंदी नाही, गुजराती नाही, कोणत्याच भाषेत नाही. तुमचा विषय साहित्य आहे तर शोधून काढा. ही काय भानगड आहे ते." त्यांनी बरेच परिश्रम घेऊन अभ्यास केला, गावोगाव परिसंवाद घडवले.

 आम्ही गद्य माणसं असल्यामुळे डाव्या चळवळीकडे आहेत तशी लेखक कवी माणसं आमच्याकडे वळत नाहीत हे खरं आहे.

 मी शेतकरी जीवनाचं उदात्तीकरण करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काय ते जीवन, काय ती हिरवी हिरवी झाडं, काय स्वच्छ हवा, कसं झुळझुळ पाणी, शेतीवर असणं म्हणजेच परमेश्वराच्या सान्निध्यात असणं असला वाह्यातपणा मी काही केला नाही.

 शेतकरी ही एक जीवनपद्धती आहे. इतिहासाच्या एका ठरावीक काळामध्ये त्यांचं

महत्त्व होतं. पण पुढे, जितकी माणसं शेतीतून निघून बिगरशेती व्यवसायाकडे वळतील तितका त्या समाजाचा विकास आहे. फक्त, शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेलं वरकड मूल्य

अंगारमळा । ११७