पान:अंगारमळा (Angarmala).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्वयंप्रेरणेने लिहिले जाणे काही अशक्य नाही; भास्कर चंदनशिवांना काही आम्ही सांगायला गेलो नाही की तुम्ही लिहा. पण जर का आत्मप्रेरणेने कुणी साहित्य तयार करायला निघालेलं नसेल आणि त्याला जर का आपण लिहिण्याची गळ घातली आणि असं जर लिहिलं गेलं तर तेच हत्यार आजच्या जगामध्ये चुकीचं वापरलं जाण्याचीसुद्धा शक्यता आहे. निपाणी आंदोलनात त्याचा आम्ही अनुभव घेतला आहे.

 सुरुवातीला प्रचाराचे साहित्य तयार करण्याबद्दल माझ्या आणि अरविंद वाम कुलकर्णी वगैरेंमध्ये बरेच वाद झाले. माझा प्रश्न होता की तुम्हाला कुणापर्यंत निरोप पोहोचवायचा आहे ? शेतकरी संघटनेचा विचार शेतकरी समाजापर्यंत पाहोचवायचा आहे ना? त्याला वाचता येतं का? ज्या थोड्यांना थोडंफार वाचता येतं त्यांना वाचण्यात रस नाही. ही गोष्ट आजही खरी आहे. मी 'शेतकरी संघटक'मध्ये लिहितो. पण शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरी त्या अंकाच्या पिनासुद्धा न काढलेल्या प्रती अजूनही सापडतात. आणि ज्यांना वाचायची आवड आहे ती माणसं तुमच्या प्रचाराने आणि पुस्तकांनी बदलतात यावर माझा मुळीच विश्वास नाही. कारण माणसाचं विचाराचं इंद्रिय मेंदू नसून खिसा आहे. माणूस विचार करतो म्हणजे आपल्या खिशाला परवडणारं सोयीस्कर जे आहे त्याचं समर्थन करण्याकरता त्याचा मेंदू वेगवेगळे तर्कवितर्क लढवतो त्यामुळे मतपरिवर्तन हे काही खरं नाही. ज्याचा पगार ठरलेला आहे तो शेतीमालाच्या भावाच्या बाजूने येणं शक्य नाही; अपवादानं एखादा येईल. पण साधारणपणे पगारदाराच्या मनातला हिशोब असा की तीन हजार रूपये पगारातल्या पाचशे रूपयांता जर का दूध, भाजीपाला, खाणंपिणं करता आलं तर उरलेल्या अडीच हजारात मला अमुक खरेदी करता येतं, पुढच्या महिन्यात रेडिओ घेता येईल, पुढच्या वर्षापर्यंत टेलिव्हिजन घेता येईल. असे त्याचे हिशेब सगळे तयार असतात. तेव्हा ज्वारीचा भाव तुम्ही वाढवून मागितला की त्याच्यासमोर उत्पादनखर्च येत नाही, तुमच्या 'माये'ची उघडी पाठ येत नाही, तुमच्या डोळ्यातले अश्रू येत नाहीत, रिकामं जातं येत नाही. खाण्यापिण्यावर पाचशेच्या ऐवजी सातशे रूपये खर्च करावे लागले तर माझा रेडिओ आणि टू इन वन यायला किती वेळ लागेल याबद्दल पहिल्यांदा त्याच्या मनात प्रश्न उभा राहातो. आणि मग, तो युक्तिवाद शोधून काढतो- शेतीमालाचा रास्त भाव हे मुळी गरिबाच्या फायद्याचं कलम आहे का? यात शेतमजुरांचा विचार आहे का? त्यांनी फारसे शेतमजूर पाहिले असतात असे नाही. त्यांच्या घरची मोलकरीण जिन्याखाली तुटक्या कपातून चहा पीत असेना. हे युक्तिवाद अशासाठी काढले जातात की मुळात आर्थिक

अंगारमळा । ११६